Patanjali under probe for suspicious transactions : बाबा रामदेव यांच्याशी संबंधित पतंजली आयुर्वेद लिमीटेड कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने या कंपनीला फेडरल इकॉनॉमिक इंटेलिजन्स एजन्सीनी उघड केलेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. ब्लूमबर्गने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने फर्मला यासंबंधीची नोटीस बजावली असून संभावित निधी वळवणे आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे उल्लंघन यासंबंधीचा तपास केला जात आहे.

यंत्रणांच्या रडारावर आलेले योगगुरू रामदेव यांच्या कंपनीचे व्यवहार हे असामान्य आणि संशयास्पद असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी तपास सुरू असल्याने या व्यवहारांची रक्कम मात्र उघड करण्यात आलेली नाही. तसेच मंत्रालयाच्या या नोटीसला उत्तर देण्यासाठी पतंजलीला सुमारे दोन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.

पतंजली अडचणीत?

गेल्या काही काळापासून पतंजली आयुर्वेद ही कंपनी चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. केल्या वर्षी कंपनीच्या युनिटला कथित टॅक्स उल्लंघन आणि चुकीचा रिफंड दावा केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस मिळाली होती. याबरोबरच कंपनीच्या उत्पादनाचे चुकीच्या जाहिराती केल्याबद्दल कंपनीला चांगलीच टीका सहन करावी लागली होती. सर्वोच्च न्यायालयाने ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहीराती) कायदा, १९५४ चे उल्लंघन केल्याचा दाखल देत कंपनीला विविध आजारांवर उपचार म्हणून त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करण्यास मनाई केली होती.

तसेच याच कायद्याअंतर्गत फेब्रुवारी २०२५ मध्ये केरळ ड्रग्ज कंट्रोल डिपार्टमेंटने राज्यातील वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये रामदेव आणि पतंजलीविरोधात २६ खटले चालू असल्याचे नोंदवले होते. इतकेच नाही तर अनेक वृत्तपत्रांवर देखील वादग्रस्त जाहिराती छापल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली.

पतंजली आयुर्वेद खाजगी मालकीचा असली तरी त्यांची लिस्टेड उपकंपनी पतंजली फूड्स लिमिटेडाला याचे परिणाम भोगावे लागले आहेत. या महिन्यात आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स जवळपास १० टक्क्यांनी घसरले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.