बुधवारी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं भाजपात प्रवेश केला. तिच्या भाजपा प्रवेशानंतर बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टानं तिचं नाव न घेता निशाणा साधला. कोणी विनाकारण पक्षाशी जोडलं गेलं हे मी पहिल्यांदाच ऐकलं आहे, असं म्हणत तिने सायनाच्या पक्षप्रवेशावर वक्तव्य केलं.

विनाकारण खेळणं सुरू केलं, आता विनाकारण पक्षाशी जोडले गेले, हे पहिल्यांदा ऐकलं आहे, असं म्हणत ज्वाला गुट्टानं नाव न घेता सायना नेहवालला टोला लगावला. तिनं यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. बुधवारी सायना नेहवाल हिनं भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी तिच्यासोबत तिची मोठी बहिण चंद्रांशू नेहवाल हिनंही भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलं. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपाचे महासचिव अरूण सिंग म्हणाले होते की, “सायना नेहवाल हिनं अनेक पदकं मिळवून देशाची मान अभिमानानं उंचावली आहे.” पक्षप्रवेशानंतर सायनानं जे.पी.नड्डा यांचीही भेट घेतली होती.

पंतप्रधानांकडून प्रेरणा
“मी स्वत: खुप मेहनत करते आणि मला मेहनती लोक आवडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवस-रात्र एक करून देशासाठी काम करत आहेत. त्यांच्यासोबत मला जर काम करण्याची संधी मिळाली तर मी माझ्य भाग्य समजेन,” असं सायना बोलताना म्हणाली. २०१५ मध्ये वर्ल्ड बॅडमिंटन रॅकिंगमध्ये सायना नेहवाल पहिल्या स्थानावर होती. त्यावेळी तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपली एक रॅकेट भेट म्हणून दिली होती.