वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे शुक्रवारी संध्याकाळी जी-२० शिखर परिषदेसाठी भारतात आगमन झाले. शिखर परिषदेत सहभागी होण्याबरोबरच बायडेन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर स्वतंत्रपणे द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. मात्र, या चर्चेचे वार्ताकन करण्यासाठी आलेल्या अमेरिकी पत्रकारांना मर्यादित प्रवेश मिळणार आहे.त्यावरून संतापलेल्या या पत्रकारांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हान आणि व्हाइट हाउसचे प्रेस सेक्रेटरी केरीन जीन-पियरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते.

सुलिव्हान यांनी सांगितले की, अध्यक्ष बायडेन पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत, मात्र यासाठी पत्रकारांना प्रवेश मिळणार नाही. भारतातील प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांचे अधिकार हे मुद्दे बायडेन आणि मोदी यांच्या भेटीमध्ये उपस्थित केले जातील का असा प्रश्न विचारला असता जीन पियरे म्हणाल्या की, बायडेन नेहमीच मानवाधिकारासाठी महत्त्वाचे मुद्दे नेहमीच उपस्थित करतात. पंतप्रधान मोदी यांच्यासह इतर अनेक नेत्यांकडे त्यांनी हा मुद्दा यापूर्वी उपस्थित केला आहे अशी पुस्ती त्यांनी जोडली.बायडेन यांचा हा द्विपक्षीय भारत दौरा नसल्यामुळे ही चर्चा पंतप्रधानांच्या कार्यालयात न होता त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीसाठी काही शिष्टाचार असल्यामुळे पत्रकारांना मुक्त प्रवेश मिळणार नसल्याची सारवासारव सुलिव्हान यांनी केली.