Woman Harassment On Moving Rapido Bike Bengaluru: बंगळुरूमध्ये एका महिला प्रवाशाने रॅपिडो चालकावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पीडितेने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याचबरोबर तिने पोलीस तक्रारही दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ही घटना गुरुवारी (६ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजता घडली. या प्रकरणी विल्सन गार्डन पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
पीडित तरुणीने इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये या घटनेचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. तिने लिहिले की, “मी चर्च स्ट्रीटवरून माझ्या पीजीला परतण्यासाठी रॅपिडो बुक केली. रॅपिडोवरून जात असताना चालकाने माझ्या पायाला कोपऱ्याने स्पर्श करण्याचा वारंवार प्रयत्न केला. ते इतके अचानक घडले की मला ते समजलेही नाही. म्हणून मी माझ्या मोबाईलवर ती घटना रेकॉर्ड केली. जेव्हा त्याने पुन्हा माझ्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी म्हणाले, ‘भाऊ, तू काय करतोयस? हा प्रकार थांबव.’ पण तो थांबला नाही.”
तरुणीने पुढे सांगितले की, ती चालकास थांबण्यास सांगू शकत नव्हती कारण ती शहरात नवीन होती आणि तिला बाईक कुठून जात आहे हे माहित नव्हते.
पीडितेने पोस्टमध्ये असेही सांगितले की, “पीजीमध्ये पोहोचल्यानंतर जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीला हा प्रकार लक्षात आला. त्याने मला विचारले की काय झाले. मी त्याला घटनेबद्दल सांगितले तेव्हा त्याने चालकाला जाब विचारला. यावर त्याने माफी मागितली आणि तो पुन्हा असे करणार नाही असे म्हणाला. पण, जाताना त्याने माझ्याकडे बोट दाखवले आणि इशारा केला ज्यामुळे मला आणखी असुरक्षित वाटले.”
पोस्टच्या शेवटी तरुणी म्हणाली की, “मी हे शेअर करत आहे जेणेकरून कोणत्याही महिलेला कॅबमध्ये किंवा बाईकवर पुन्हा असे अनुभवावे लागू नये. माझ्यासोबत हे पहिल्यांदाच घडले नाही. पण आज मी गप्प राहू शकले नाही कारण मला खूप असुरक्षित वाटत आहे.”
या व्हिडिओमुळे सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म्सनी चालकांची पार्श्वभूमी कठोरपणे तपासण्याची आणि त्यांची निवड करताना कठोर अटी लादण्याची अवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
