भाजपाच्या नेत्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जगभरातून विविध देशांनी आपली नाराजी व्यक्त केली. यात आखाती देश आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशने संयमी भूमिका घेतली आहे. “प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही आगीत तेल ओतणार नाही,” असं मत बांग्लादेशचे माहिती व प्रसारण मंत्री डॉ. हसन महमूद यांनी व्यक्त केलं. शनिवारी (११ जून) ढाका येथे भारतीय पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

मंत्री हसन महमूद म्हणाले, “भारतातील प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वक्तव्य हा बांग्लादेशमधील विषय नाही, तर तो बाहेरचा विषय आहे. हा भारताचा प्रश्न आहे. आम्हाला त्यावर काहीही बोलण्याची गरज वाटत नाही. भारतातील अंतर्गत संस्थांनी यावर कारवाई केली आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदन. आम्ही या विषयावर आगीत तेल ओतणार नाही.”

जगभरात मुस्लीम देशांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील या वक्तव्यांचा निषेध करत नाराजी व्यक्त केलीय. अगदी ५७ देशांच्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनने (OIC) देखील या वक्तव्यांचा निषेध केलाय.

याबाबत बांग्लादेशमधील शेख हसिना सरकारची भूमिकेबाबत पत्रकारांनी विचारलं असता हसन महसूद म्हणाले, “आम्ही कोठेही बोटचेपी भूमिका घेत नाहीये. प्रेषित मोहम्मद यांचा कधीही, कोठेही अपमान झाला तर आम्ही त्याचा निषेधच करतो. मात्र, भारत सरकारने यावर कारवाई केली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. भारत सरकारचं आम्ही अभिनंदन करतो. आता कायदा त्याचं काम करेन.”

हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण: बांगलादेश निर्मिती हा भारतासाठी ऐतिहासिक विजय आणि पाकिस्तानसाठी दारुण पराभव का होता? वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रेषित मोहम्मद यांचं अवमान प्रकरण बांग्लादेशातील मोठा मुद्दा नाही. मग मी आगीत तेल का ओतावं? या विषयावर आधीच पुरेसं लक्ष वेधलं गेलं नाही का? माझं काम आगीत तेल ओतणं नाही,” असंही हसन महमूद यांनी नमूद केलं.