बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका या ठिकाणी गुरुवारी रात्री उशिरा एका सात मजली इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक होरपळून जखमी झाले आहेत. बांगलादेशचे आरोग्य मंत्री सामंत लाल सेन यांनी ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयाचा दौरा केला त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ढाका येथील रुग्णालयाच्या बर्न विभागात ४० जखमींवर उपचार सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अग्निशमन दलाने काय म्हटलं आहे?

अग्निशमन दलाचे अधिकारी मोहम्मद शिहाब यांनी सांगितलं ढाका येथील बेली रोड भागात बिर्याणीचं एक प्रसिद्ध रेस्तराँ आहे. या ठिकाणी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी आग लागली. ही आग पाहता पाहता संपूर्ण इमारतीत पसरली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणली आहे. रेस्तराँमध्ये बसलेल्या ७५ लोकांना आम्ही जिवंत बाहेर काढलं आहे अशीही माहिती शिहाब यांनी दिली. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

रेस्तराँच्या मॅनेजरने काय सांगितलं?

ढाका येथील बेली रोड भागात असलेल्या ज्या इमारतीत आग लागली तिथे रेस्तराँसह कपडे, मोबाईल यांची दुकानं आहेत. रेस्तराँचे मॅनेजर सोहेल यांनी सांगितलं की आम्ही सुरुवातीला जेव्हा धूर निघताना पाहिला तेव्हा आम्ही सहाव्या मजल्यावर होतो. आम्ही पाइपच्या मदतीने खाली आलो. काही लोकांनी वरुन उड्या मारल्याने ते जखमी झाले. भीषण आग लागल्याने अनेक लोक इमारतीच्या छतावरच अडकले होते. तसंच आम्हाला वाचवा वाचवा अशा त्यांच्या किंकाळ्याही ऐकू येत होत्या असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.