सीरियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी या आठवडय़ात आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या शांतता चर्चेसाठी इराणला सहभागी होण्याचे दिलेले निमंत्रण संयुक्त राष्ट्रांनी अखेर मागे घेतले आहे. इराणला या परिषदेसाठी बोलावू नये असे अमेरिकेचे म्हणणे होते, शिवाय इराणला सहभागी करणार असाल तर या वाटाघाटींवर आम्ही बहिष्कार टाकू, असा इशारा सीरियाच्या विरोधी पक्षांच्या आघाडीने दिला होता. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांच्यावर इराणला दिलेले निमंत्रण माघारी घेण्यासाठी दबाव होता.
मून यांनी मंगळवारी सांगितले की, इराणच्या सहभागाशिवाय आता सीरियातील यादवी संघर्षांवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा होईल. इराणलाही या परिषदेची उद्दिष्टे मान्य नाहीत. बान की मून यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, इराणी नेत्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांची समजूत काढण्यात आली व या परिषदेत सहभागी होऊ नका असे त्यांना सांगण्यात आले. इराणने वचनबद्धतेला छेद देणारी वक्तव्ये केली आहेत, त्यामुळे आपण निराश झालो, असे मून यांनी म्हटले आहे. इराणने जिनिव्हा जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीत सामील व्हावे असे आवाहन त्यांनी केले. सीरियातील शांतता बोलणी मॉट्रिक्स येथे एक दिवस होत असून त्यात आता इराणचा सहभाग राहणार नाही. यापूर्वी बान की मून व संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी इराण हा सीरियातील लष्करी राजवटीचा समर्थक आहे, त्यामुळे त्यांना सीरियात शांतता नांदावी यासाठीच्या वाटाघाटीत सामील करून घ्यावे अशी भूमिका घेतली होती. ३० जून २०१२ रोजी इराणने जीनिव्हा येथील बैठकीत काढण्यात आलेल्या संयुक्त निवेदनानुसार सीरियात सत्तापरिवर्तन घडवून आणण्यास मान्यता दिली नव्हती. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार इराणने सीरियात शांतता नांदावी यासाठी काही करण्यापेक्षा तेथील यादवी युद्ध कसे धुमसत राहील याचीच काळजी घेतली, त्यामुळे त्यांना शांतता वाटाघाटीत सामील करून घेणे चुकीचे आहे.