इजिप्तमधील नाटय़मय राजकीय घडामोडींनंतर अध्यक्ष मोर्सी यांना पायउतार व्हावे लागल्याने, आता या देशात लोकशाहीची प्रतिष्ठापना शक्य तितक्या तातडीने करावी, असे आवाहन या देशाच्या लष्कराला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे. देशात अत्यंत पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने कारभार चालावा यासाठी इजिप्तमध्ये लोकशाहीची स्थापना गरजेची असून, बंडखोरांचे नेतृत्व करणाऱ्या लष्कराने यासाठी आवश्यक ती पावले तातडीने उचलावीत, अशी सूचना अमेरिकेने केली आहे.
मोर्सी यांना पदच्युत करून तेथील राज्यघटना तहकूब करण्याच्या निर्णयाने आपल्याला धक्का बसला आहे, मात्र आता जबाबदारी लष्कराची आहे, असे ओबामा यांनी सांगितले. आता मात्र या देशाच्या लष्कराने अत्यंत जलदगतीने येथे संपूर्ण लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नागरी सरकारची स्थापना करावी, असे आवाहन ओबामांनी केले. सरकार स्थापनेची ही प्रक्रिया पुरेशी पारदर्शक आणि सर्वसमावेशक असेल अशी अपेक्षाही ओबामांनी व्यक्त केली. सत्तेवर नवे लोकनियुक्त सरकार येईपर्यंत लोकांच्या हक्कांचे रक्षण करणे, लोकशाहीतील सत्ता समतोलाचे सूत्र जोपासणे आणि लोकांच्या अपेक्षांचा सन्मान राखणे या बाबी लष्करी सत्ता जोपासेल, अशी अपेक्षा ओबामांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याची स्थिती अतिशय भीतिदायक असून इजिप्तमधील सर्वच पक्षांनी हिंसेचा मार्ग टाळावा.
विलियम हेग,ब्रिटनचे परराष्ट्र सचिव
इजिप्तमधील अराजकसदृश स्थिती आणि तेथील अनिश्चितता लक्षात घेता येथे शांततामय, अहिंसात्मक आणि चर्चेच्या मार्गाने तोडगा निघावा. तसेच हा तोडगा काढताना सर्वसमावेशकतेचा विचार केला जावा. –
बॅन की मून, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्र संघ
 इजिप्तमध्ये शक्य तितक्या तातडीने लोकशाहीची स्थापना करण्यात यावी. पारदर्शक आणि मुक्त वातावरणात केंद्रीय निवडणुका घेतल्या जाव्यात. तसेच देशात राज्यघटनेची सन्मानाने अंमलबजावणी करण्यात यावी.
अ‍ॅश्टन, युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख
विद्यमान राजकीय पेचप्रसंगातून सर्वमान्य तोडगा अहिंसात्मक मार्गाने काढण्यात इजिप्तमधील सर्व पक्षांना यश येवो.
हुआ चुनयांग, प्रवक्ते, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, चीन

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barack obama pushes for peace in egypt
First published on: 05-07-2013 at 02:15 IST