New Covid Varient JN.1 Updates : करोनाबाधितांची संख्या आता पुन्हा झपाट्याने वाढताना दिसतेय. तसंच, करोनाचा उपप्रकार असलेल्या JN.1 चा प्रसार वेगाने होतोय. केरळमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण सापडला होता. आता जवळपास सहा राज्यात या विषाणूने शिरकाव केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. ANI ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. महाराष्ट्रातील बाधितांची संख्याही चिंताजनक आहे.

देशात सध्या ३ हजार ७४२ सक्रिय करोना रुग्ण आहेत. २४ डिसेंबर रोजी देशातील सहा राज्यांत ६३ रुग्ण JN.1 चे रुग्ण सापडले आहेत. यापैकी गोव्यात ३४, महाराष्ट्रात ९, कर्नाटकात ८, केरळात ६, तामिळनाडूमध्ये ४ तामिळनाडू आणि २ तेलंगणात सापडले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूच्या जेएन.१ या नव्या उपप्रकाराचे ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या गटात वर्गीकरण केले आहे. मात्र हा विषाणू लोकांच्या आरोग्यासाठी फार जोखीम निर्माण करणारा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार, जेएन.१ आरोग्यासाठी फार धोकादायक नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या लशी या विषाणूचा प्रतिकार करत असून रुग्णांना आरोग्याच्या धोक्यापासून वाचवत आहेत, असे निवेदन जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. याआधी जेएन.१ विषाणूचा मूळ वंश बीए.२.८६ ला ही ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या गटात टाकण्यात आले होते.

हेही वाचा >> देशभरात २४ तासांत आढळले ६५६ करोनाबाधित रुग्ण, सक्रीय रुग्णसंख्या ३७४२, महाराष्ट्रातही शंभरी पार

भारताला किती धोका?

जगभरात गेल्या काही दिवसांपासून पिरोला आणि जेएन-१ या उपप्रकारामुळे करोना रुग्णांच्या संख्येत निश्चितपणे वाढ झालेली आहे. अमेरिका, सिंगापूर, चीन तसेच काही युरोपीन देशांत या दोन्ही उपप्रकारांमुळे करोना संसर्ग झालेले अनेक रुग्ण आढळले आहेत. भारतात ८ डिसेंबर रोजी केरळ राज्यात या विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर केंद्र सरकारने खबरदारीच्या उपाययोजना घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानंतर केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये आरोग्यासंबंधी खबरदारी घेण्याचे आवाहन आतापर्यंत करण्यात आले. इतरही राज्ये आपापल्यापरिने उपाययोजना करत आहेत.

स्वत:चे संरक्षण कसे करावे?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार Sars-CoV-२ ची नवनवी रुपे भविष्यातही येतच राहतील. मात्र श्वसनयंत्रणेवर हल्ला करणाऱ्या विषाणूंपासून संरक्षण करण्यासाची पद्धत एकच राहील. तुमच्या परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढल्यास गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावावे. मोकळी हवा असलेल्या ठिकाणी राहिल्यास करोना संसर्गाची शक्यता कमी होते. वारंवार हात धुवायला हवेत, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

हेही वाचा >> करोनाच्या ‘जेएन.१’ उपप्रकाराचे ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ गटात वर्गीकरण; जाणून घ्या आरोग्यासाठी किती धोकादायक?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनाचे रुग्णही वाढले

सध्या देशात ३,७४२ सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमध्ये गेल्या २४ तासांत १२८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या केरळमध्ये तीन हजार सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. तर कर्नाटकमध्ये २७१ सक्रीय करोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत कर्नाटकमध्ये ९६ नवे रुग्ण सापडले आहेत. या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३५ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह राज्यात सध्याच्या घडीला १०३ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.