स्थैर्य आणि सातत्याअभावी समुहाच्या कामात कोणतीही पोकळी निर्माण होऊ नये यासाठी मी हंगामी अध्यक्षपद स्विकारले आहे. हा कालावधी अत्यंत लहान असेल. लवकरच कायमस्वरूपी नव्या नेतृत्त्वाची नियुक्ती केली जाईल, असे रतन टाटा यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, रतन टाटा यांनी समुहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, समुहातील कंपन्यांच्या प्रमुखांनी नेतृत्त्वबदलाची चिंता न करता आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे, असे म्हटले. आपापल्या क्षेत्रात समुहाचे नेतृत्त्व करून समभागधारकांना अधिकाअधिक परतावा कसा देता येईल, याकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही यावेळी रतन टाटा यांनी दिला.
टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सोमवारी सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी दूर करण्यात आले होते. अवघ्या चार वर्षांच्या कारकीर्दीनंतर सायरस मिस्त्री यांना पदावरून दूर केल्याने उद्योगजगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीच्या दीर्घकालीन भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे टाटा सन्सकडून स्पष्ट करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, टाटा सन्सच्या निर्णयाविरोधात  सायरस मिस्त्री मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे टाटा सन्स, रतन टाटा आणि सर दोराबजी ट्रस्ट यांच्याविरोधात कॅव्हेट दाखल केल्या आहेत.  शापुरजी पालनजी समुहाने सायरस मिस्त्रींना अध्यक्षपदावरून दूर करणे, अवैध असल्याचे म्हटले आहे. सायरस हे पालनजी मिस्त्री यांचे पूत्र असून ते समुहाचे प्रमुख आहेत. शापुरजी पालनजी समुहाने टाटा सन्सच्या या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सांगत हा निर्णय एकमताने घेण्यात आला नसल्याचे म्हटले आहे. टाटा सन्सच्या एकुण ९ संचालकांपैकी ८ सदस्यांनी काल मतदान केले. यापैकी सहाजणांनी सायरस मिस्त्री यांच्याविरोधात तर दोनजण तटस्थ राहिले. त्यामुळे या निर्णयावर शापुरजी पालनजी समुहाचा आक्षेप असून ते न्यायालयात दाद मागणार आहेत. पदावरून हटवितांना संबंधित व्यक्तीला १५ दिवस आधी तशी सूचना द्यावी लागते, असे शापूरजी पालनजी समूहातील सूत्रांनी म्हटले आहे. याबाबत टाटा समूहाने गैर पद्धतीने निर्णय घेतल्याची समूहाची भावना आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Became interim chairman to ensure continuity says ratan tata
First published on: 25-10-2016 at 15:46 IST