भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान अमेरिकेने मोठा निर्णय घेतला. शत्रूराष्ट्रांच्या हल्ल्यांपासून बचाव होण्याकरता अमेरिकेने गोल्डन डोम सुरक्षा प्रणाली विकसित करण्याचे घोषित केले आहे. या प्रस्तावित गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा भाग होण्यासाठी ६१ अब्ज डॉलर्सची डोनाल्ड ट्रम्प यांनी मागणी केली आहे. अन्यथा त्यांनी त्यांचा देश अमेरिकेचे ५१ वे राज्य म्हणून घोषित करण्याचं आवाहन केलं आहे.
“आमच्या शानदार गोल्डन डोम सिस्टीमचा भाग होऊ इच्छिणाऱ्या कॅनडाला मी सांगितले की यांना ६१ अब्ज डॉलर्स खर्च येईल, परंतु जर ते आमच्या देशातील राज्य बनले तर त्यांना शून्य डॉलर्स खर्च येईल”, ट्रम्प यांनी मंगळवारी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले.
गोल्डन डोम काय आहे?
अमेरिकेवर शत्रूराष्ट्राकडून होणारा कोणताही संभाव्य क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ला परतवून लावण्यासाठी देशावर एक आभासी छप्पर उभारणे, ही ट्रम्प यांच्या गोल्डन डोमची मूळ संकल्पना आहे. यामध्ये जमिनीवरील यंत्रणा असतीलच, पण आता थेट अंतराळात क्षेपणास्त्रे तैनात करण्याची ट्रम्प यांची संकल्पना आहे. या मोहिमेचे बारकावे अद्याप समोर आले नसले, तरी याद्वारे जमिनीवर आणि अंतराळात रडार, इंटरसेप्टर आणि क्षेपणास्त्रांचे जाळे अमेरिकेला विणायचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या योजनेत सहभागी होण्यास कॅनडानेही सकारात्मकता दर्शवली होती. याकरता प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दिली होती. दरम्यान, अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील वाद सातत्याने उफाळून येतात. कॅनडाविरोधात व्यापार युद्धही सुरू झाल्याचं म्हटलं जातंय. तसंच, कॅनडाला अमेरिकेत सामावून घेण्यासाठीही अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.