भाजपाध्यक्ष जे पी नड्डा तसंच इतर भाजपा नेत्यांवर झालेला हल्ला आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फटकारलं आहे. जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले आहेत. “पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्था गेल्या अनेक काळापासून खालावत चालली आहे. परिस्थिती चिंताजनक पातळीवर आहे,” असंही ते म्हणाले आहेत. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनात्मक बांधील आहेत. त्यांना घटनेचं पालन करावंच लागेल,” असं राज्यपालांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील ढासळत्या कायदा सुव्यवस्थेसाठी ममता बॅनर्जी सरकारला जबाबदार ठरवलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांनी बाहेरचे उल्लेख करत भाजपासंबंधी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत म्हटलं की, “भारतीयांबद्दल बाहरेचे म्हणून बोलत आहेत का ? मुख्यमंत्री मॅडम आगीशी खेळू नका”.
आणखी वाचा- “…तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा”; ममता बॅनर्जींनी उडवली खिल्ली
“काल जे झालं ते फार दुर्दैवी होती. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तेदेखील राज्यातील नेत्यांना न घाबरता,..पण गुरुवारी तसं झालं नाही,” अशी खंत राज्यपालांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करणारे राज्य सरकारचं समर्थन असणारे होते असा गंभीर आरोपही केला.
आणखी वाचा- नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्यासंदर्भात ममत बॅनर्जींनी व्यक्त केली वेगळीच शंका; म्हणाल्या…
“माझी ममता बॅनर्जींना विचार करावा अशी विनंती आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची मी गंभीर दखल घेतली आहे. कायदा आणि राज्यघटनेवर विश्वास असणारी मुख्यमंत्री असं वक्तव्य कसं काय करु शकते?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे. बंगाली संस्कृतीचा विचार करुन आपण माफी मागा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
आणखी वाचा- “पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा,” राम कदमांची भगतसिंह कोश्यारींकडे मागणी
ममता बॅनर्जी यांनी भाजपा नेत्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर हे सर्व नाटक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राज्यपालांनी आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचं सांगितलं आहे.