Bengaluru Hit And Run : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. अपघाताचे काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटे येतात. आता देखील एक अशाच प्रकारचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका कार चालकाने सिगारेटच्या वादातून दुचारीस्वरांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
झालं असं की, सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या दोन जणांनी सिगारेट देण्यास नकार दिल्याने एका कार चालकाने त्या दुचाकीचा पाठलाग करत जाणूनबुजून चारचाकीने दुचाकीस्वरांना धडक देत चिरडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. सिगारेटच्या वादातून झालेल्या या हिट अँड रनच्या घटनेत २९ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाचा मृत्यू आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना १० मे रोजी बेंगळुरूमध्ये घडल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, जेव्हा संजय आणि चेतन हे दोघे पहाटे ४ वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानावर चहा घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्या ठिकाणी एक व्यक्ती त्याच्या पत्नीसह ह्युंदाई क्रेटा गाडीमधून त्या ठिकाणी आला. तेव्हा त्या कार चालकाने संजय आणि चेतन या दोन मित्रांना सिगारेट मागितली. पण त्यांनी सिगारेट देण्यास नकार दिला. तसेच त्या व्यक्तीला स्वतःची सिगारेट खरेदी करण्यास सांगितलं. यावरून त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाला.
या वादानंतर स्थानिक लोकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. त्यानंतर संजय आणि चेतन त्यांच्या दुचाकीवरून निघून गेले. मात्र, त्यानंतर कार चालकाने त्यांचा पाठलाग केला आणि रस्त्याने यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकीला पाठिमागून जोराची धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी जवळच्या दुकानावर जाऊन आदळली. त्यामध्ये संजय गंभीर जखमी झाला, तर चेतन घटनास्थळीच बेशुद्ध पडला.
त्यानंतर दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर दोन दिवसांनी संजयचा मृत्यू झाला, तर चेतनवर उपचार सुरू असल्याची माहिती सांगितली जात आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रतीकला बेंगळुरू पोलिसांनी अटक केलं असून पुढील तपास सुरु आहे.