Bengaluru Startup CEO Brutal Verbal Abuse : अलीकडच्या काळात Reddit हा मंच कर्मचाऱ्यांचं व्यथा मांडण्याचं ठिकाण बनलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी त्यांची दुःखे, चिंता, कामाचा ताण या मंचावर शेअर करताना दिसतात. काहीजण स्वतःची ओळख लपवून तर काहीजण थेट आपापल्या कंपन्यांमध्ये होणारं शोषण, त्रास व व्यथा रेडिटवर व्यक्त करत आहेत. एका व्यक्तीने त्याच्या कार्यालयातील भीषण अनुभव रेडिटवर शेअर केला आहे.

या व्यक्तीने सांगितलं की त्याच्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने (सीईओ) त्याच्याशी दुर्व्यहार केला, सीईओ व्हीडिओ कॉलवर त्याच्यावर खेकसला ज्यामुळे कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली होती. हा कर्मचारी म्हणाला, “मी ऑफिस व्हिडीओ कॉलदरम्यान पूर्णपणे कोलमडून पडलो होतो. कारण आमचा सीईओ माझ्यावर मोठमोठ्याने खेकसत होता, ओरडत होता. मी अजूनही त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. मी आमच्या कंपनीत रुजू झाल्यापासून सातत्याने मानसिक छळाचा सामना करतोय”.

राजीनाम्यानंतरही छळ चालूच, एचआरकडून मनःस्ताप

Redditor ने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की “बंगळुरूमधील एका स्टार्टअपमध्ये मी सातत्याने मानसिक छळ सहन करतोय. कंपनीचा सीईओ, जो तांत्रिक विभागाशी अनभिज्ञ आहे तो प्रत्येक गोष्ट मायक्रोमॅनेज करू पाहतोय. अवास्तव डेडलाइन्स देतो आणि सतत ओरडत असतो. अखेर गुगल मीटवर सर्वांसमोर तो माझ्यावर खेकसत राहिला. ते पाहून मी पूर्णपणे कोलमडून गेलो. मला श्वास घेता येत नव्हता. मला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. शेवटी मी राजीनामा दिला. मात्र, कंपनी व एचआरने माझ्या राजीनाम्यानंतरही त्यांचा दुर्व्यवहार चालू ठेवला”.

या कर्मचाऱ्याने सांगितलं की २०२४ मध्ये तो बंगळुरूतील एका छोट्या इव्हेंट डिस्कव्हरी स्टार्टअपमध्ये रुजू झाला होता. ज्युनिअर डेटा सायंटिस्ट हे त्याचं पद होतं. त्याला वाटलं या कामात खूप काही शिकायला मिळेल. मात्र, त्याने दावा केला आहे की “शिकणं खूप लांबची गोष्ट, उलट त्या कंपनीत अनेक महिने माझा मानसिक छळ झाला. आमचा सीईओ खूप छळ करायचा. तो स्वतःला डेटा सायन्सच्या क्षेत्रातला दिग्गज मानत होता. मात्र, त्याच्याकडे या क्षेत्राशी संबंधित कुठलीही पदवी अथवा तांत्रिक शिक्षण नव्हतं”.

“सीईओने मला मानसिकरित्या उद्ध्वस्त केलं”

“आमचा सीईओ त्याच्या मनाला वाटेल ती डेडलाइन सांगायचा. त्याला वाटेल त्या पद्धतीने प्रोजेक्टमध्ये बदल करायचा. मात्र, त्यामुळे काम बदलायचं. त्यातून जे निकाल त्याच्यासमोर येत होते ते पाहून तो स्वतःवरील नियंत्रण गमावून बसायचा. सर्वांसमोर मोठमोठ्याने खेकसायचा. त्या काळात त्याने मला मानसिक, व्यावसायिक व वैयक्तिकरित्या उद्ध्वस्त केलं. मी शांत आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे कदाचित तो माझ्यावर सातत्याने शाब्दिक आक्रमण करत असावा. माझ्या रिपोर्टिंग मॅनेजरला बाजूला करून तो सातत्याने थेट माझ्याशी बोलायचा”.

वरिष्ठांकडून होणाऱ्या छळामुळे कर्मचारी बेशुद्ध

या कर्मचाऱ्याने म्हटलं आहे की “मी सात महिने दररोज १२-१४ तास काम करायचो. सुट्टीच्या दिवशी देखील तितकंच काम करायचो. सात महिन्यात केवळ दोन दिवस सीक लिव्ह घेतली. कितीही काम केलं तरी सीईओचं समाधान होत नव्हतं. या त्रासाला कंटाळून मी राजीनामा दिला. त्यानंतर आठवडाभराने एक ऑनलाइन मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये माझ्यावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला झाला. तो माझ्यावर क्रूरपणे खेकसत होता. त्यामुळे मला श्वास घेता येत नव्हता, छातीत दुखू लागलं. मी खुर्चीवरून जवळजवळ खाली पडलो. माझी प्रकृती इतकी बिघडली होती की मला रुग्णालयात नेण्यात आलं”.