पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने २०१४-१५ साली ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला करण्यात आले. मात्र मागील पाच वर्षांमध्ये या अभियानासाठी देण्यात आलेल्या एकूण निधीपैकी ५६ टक्क्यांहून अधिक निधी प्रत्यक्षात मुलींच्या शिक्षणासाठी खर्च न करता तो केवळ जाहिरातबाजीसाठी खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या अभियानासाठी पाच वर्षांमध्ये एकूण ६४८ कोटी निधी केंद्र सरकारने दिला. त्यापैकी चक्क ३६४ कोटी ६६ लाख रुपये केवळ जाहिरातींसाठी खर्च करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सुरु करण्यात आलेल्या या अभियानातील ५६ टक्के निधी हा जाहिरातबाजीसाठी वापरला गेला आहे. २८० कोटींपैकी २५ टक्क्याहून कमी रक्कम ही देशभरातील राज्यांना आणि जिह्यांमध्ये वितरित करण्यात आली आहे. सरकारनेच ही माहिती जाहीर केली आहे. मुलींचा खालवत जाणारा जन्मदर, मुलींचे शिक्षण आणि इतर समस्यांवर मात करण्यासाठी २०१५ साली हे अभियान सुरु करण्यात आले होते.

महिला आणि बालविकास मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री विरेंद्र कुमार यांनी चार जानेवारी रोजी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार मागील चार वर्षांमध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानासाठी केंद्र सरकाने ६४८ कोटी रुपयांची तरतूद केली. त्यापैकी ३६४ कोटी ६६ लाख म्हणजेच ५६.२७ टक्के निधी हा खेवळ जाहिरातबाजीवर उडवण्यात आला. एकूण निधीपैकी केवळ २४.५ टक्के म्हणजेच १५९ कोटी १८ लाख रुपये राज्यांना आणि जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आल्याचे कुमार यांनी लोकसभेत सांगितले.

२०१८-१९ या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास या अभियानासाठी देण्यात आलेल्या एकूण २८० कोटींपैकी १५५ कोटी ७१ लाख रुपये हे या अभियानाच्या जाहिरातीसाठी मोदी सरकारने खर्च केला आहेत. तर केवळ ७० कोटी ६३ लाख रुपये हे राज्यांना आणि जिल्हा प्रशासनांना देण्यात आले. तर एकूण निधीपैकी १९ टक्के म्हणजेच ५३ कोटी ६६ लाख रुपये सरकारने वापरलेच नसल्याची माहिती समोर आली आहे.

२०१८-१९ ची स्थिती परवडली अशी आकडेवारी २०१७-१८ ची आहे. या आर्थिक वर्षात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’साठी देण्यात आलेल्या २०० कोटींपैकी ६८ टक्के म्हणजेच १३५ कोटी ७१ लाख रुपये केवळ जाहिरातींसाठी वापरण्यात आले. २०१६-१७ साली तर सरकारने या अभियानासाठी जाहिरातबाजीसाठी २९ कोटी ७९ लाख रुपये खर्च केले. तर त्याच वर्षी प्रत्यक्षात कामासाठी केवळ २ कोटी ९० लाख रुपये वापरण्यात आले. वेगवेगळ्या राज्यातील खासदारांनी या अभियानाबद्दल विचारलेल्या प्रश्नांचे सविस्तर उत्तर देताना कुमार यांनी लोकसभेमध्ये ही सर्व माहिती दिली आहे.

या आकडेवारीनंतर योग्य पद्धतीने नियोजन न केल्याने, निधीचा योग्य उपयोग न झाल्याने हे अभियान अपयशी ठरले असं म्हणता येईल का या प्रश्नाला कुमार यांनी नकारार्थी उत्तर दिले. ‘२०१८-१९ मध्ये देशातील सर्व ६४० जिह्यांमध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबवण्यात आले आहे’, असं कुमार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beti bachao beti padhao centre spent 56 percent of funds on publicity minister tells lok sabha
First published on: 23-01-2019 at 17:18 IST