केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शनिवारी आणखी एका करोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. ‘कोव्हॅक्सीन’ ही लस ‘भारत बायोटेक’ने देशात विकसित आणि उत्पादित केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ऑक्सफर्ड’ने विकसित केलेल्या आणि सीरम इन्स्टिटय़ूटने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध मानक नियंत्रक संघटनेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यापाठोपाठ शनिवारी तज्ज्ञांच्या समितीने ‘कोव्हॅक्सीन’ लशीच्या आपत्कालीन वापरास काही शर्तीवर मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘कोव्हॅक्सीन’ लस हैदराबाद येथील ‘भारत बायोटेक’ने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने विकसित केली आहे. ही पहिली देशी लस आहे. भारत बायोटेकने शुक्रवारप्रमाणे शनिवारीही पुन्हा ‘सीडीएससीओ’च्या तज्ज्ञ समितीपुढे अतिरिक्त माहिती, वस्तुस्थिती आणि विश्लेषणाचे सादरीकरण केले. त्यानंतर तज्ज्ञ समितीने लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देऊन, अंतिम वापराची शिफारस केली, असे सूत्रांनी सांगितले.
‘कोव्हॅक्सीन’च्या आपत्कालीन वापरासाठी ‘भारत बायोटेक’ने भारताच्या औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) ७ डिसेंबर रोजी अर्ज केला होता.

‘सीडीएससीओ’च्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारीच ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या आणि पुण्यातील ‘सीरम’ संस्थेने तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लशीच्या वापरास मंजुरी देऊन तशी शिफारस ‘डीसीजीआय’ यांच्याकडे केली होती. लसीकरण सुरू करताना करोना प्रतिबंधक उपाययोजना सुरूच राहतील, त्यांबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही आणि पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्याचबरोबर आघाडीवर काम करणाऱ्या दोन कोटी कर्मचाऱ्यांचे विनाशुल्क लसीकरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.

तीन कोटी करोना योद्धय़ांना लस मोफत – आरोग्यमंत्री

पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या दोन कोटी कर्मचाऱ्यांचे विनाशुल्क लसीकरण करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. ५० वर्षांवरील आणि त्याखालील जोखमीच्या गटातील नागरिकांसह २७ कोटी नागरिकांना येत्या जुलैपर्यंत लस देण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक उपाय आवश्यकच!

करोना लशीची परिणामकारकता आणि सुरक्षितता याविषयीच्या अफवा पसरवू नयेत आणि त्यांवर विश्वासही ठेऊ नये, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी केले. लसीकरण सुरू करताना करोना संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत तडजोड केली जाणार नाही, त्या सुरूच राहतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात लसीकरणाची सराव फेरी पूर्ण

नागपूर, पुणे, जालना, नंदुरबार जिल्ह्य़ात प्रत्येकी तीन केंद्रांवर शनिवारी करोना लसीकरण सराव फेरी घेण्यात आली.
पुणे ग्रामीण आणि शहरी भागात लसीकरणाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडून लस उपलब्ध होताच डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पुणे ग्रामीण परिसरात मुळशी तालुक्यातील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पुणे शहर भागात औंध जिल्हा रुग्णालय तर पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात जिजामाता रुग्णालय आरोग्य केंद्र या तीन ठिकाणी ७५ जणांच्या लसीकरणाची सराव फे री करण्यात आली. पुण्यात लसीकरण सत्रासाठी ५ सदस्यांचा संघ तयार करण्यात आला आहे.

नागपुरातील तीन केंद्रांवर ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीची प्रतिकात्मक मात्रा दिली गेली. या दरम्यान महापालिकेच्या के. टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात व कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण सराव यशस्वी झाला. परंतु डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील केंद्रावर प्रशासनात गोंधळ उडाला.

नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, नवापूर उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेचे आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्र या तीन ठिकाणी करोना लसीकरण सराव फेरी घेण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat biotech covaxin coronavirus vaccine mppg
First published on: 03-01-2021 at 01:47 IST