गेल्या काही दिवसांपासून भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO कडून परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतात जानेवारी महिन्यातच कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जागतिक स्तरावर कोवॅक्सिनचा अधिकृत वापर सुरू करण्यासाठी या लसीला डब्ल्यूएचओची मान्यता असणं आवश्यक आहे. पण अजूनही भारत बायोटेकनं बनवलेल्या कोवॅक्सिनला जागतिक संघटनेची मान्यता मिळालेली नसल्यामुळे तिचा वापर इतर देशांमध्ये करता येणं कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर नेमकी कोवॅक्सिनला परवानगी कधी मिळणार? या प्रश्नावर WHO कडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या लसींच्या यादीमध्ये कोवॅक्सिनचा समावेश व्हावा, यासाठी भारत बायोटेककडून बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरू आहेत. प्रामुख्याने भारतात कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर परदेशात जाणाऱ्या भारतीयांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण डब्ल्यूएचओच्या मान्यतेशिवाय इतर देशांमध्ये कोवॅक्सिनचे डोस दिले जात नसल्यामुळे भारतातून परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना दोन्ही डोस असल्याशिवाय प्रवास करणं अशक्य होऊन बसलं आहे. मात्र, डब्ल्यूएचओनं कोवॅक्सिनला मान्यता दिल्यास परदेशात देखील कोवॅक्सिनचे डोस घेता येणं शक्य होणार आहे. तसेच, कोवॅक्सिन घेतलेल्या भारतीयांना परदेशात प्रवासाची परवानगी मिळू शकणार आहे.

यासंदर्भात डब्ल्यूएचओकडून ट्विटरवर भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. “आम्हाला कल्पना आहे की कोवॅक्सिनला WHO ची आपत्कालीन वापर यादीत समावेशासाठी मान्यता मिळावी, यासाठी अनेकजण प्रतीक्षा करत आहेत. पण आम्ही याबाबत घाईगडबड करू शकत नाही”, असं WHO कडून या ट्वीटमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोणत्याही लसीला परवानगी देण्याआधी..

दरम्यान, कोणत्याही लसीला परवानगी देण्याआधी योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात डब्ल्यूएचओनं स्पष्टीकरण दिलं आहे. “कोणत्याही उत्पादनाला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यापूर्वी ते सुरक्षित आणि प्रभावी असल्याची खात्री करून घेणं आवश्यक आहे”, असं देखील या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. भारत बायोटेककडून अजून काही माहिती अपेक्षित असल्याचं डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी यासंदर्भात माहिती देताना केलेल्या ट्वीटमध्ये २६ ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीविषयी उल्लेख केला आहे. “डब्ल्यूएचओच्या तांत्रिक सल्लागारांच्या मंडळाची २६ ऑक्टोबर रोजी कोवॅक्सिनला मान्यता देण्यासंदर्भात बैठकीच चर्चा होणार आहे”, असं त्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात कोवॅक्सिनच्या परवानगी विषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.