मराठवाडय़ाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न, सरकारची राज्यसभेत माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठवाडय़ातील दुष्काळाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भीमा व मांजरा या दोन नद्या जोडण्यात येतील, असे केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री सन्वरलाल जाट यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

मराठवाडा व बुंदेलखंड भागात दुष्काळाची समस्या गंभीर असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाडय़ातील दुष्काळाच्या समस्येवर भीमा व मांजरा या दोन नद्यांची आंतरजोडणी केली जाईल. केंद्रीय भूजल मंडळाला बुंदेलखंड व मराठवाडय़ात पाण्याचे झरे कुठे आहेत ते शोधून त्यांचे व्यवस्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात जलपुनर्भरणाचे कार्यक्रम हाती घेऊन भूजल क्षमता वाढवली जाईल. केंद्रीय भूजल मंडळाने २०१३ मध्ये भारतातील भूजलाचे कृत्रिम पुनर्भरण करण्यासाठी बृहत् आराखडा तयार केला आहे. त्यात पावसाच्या पाण्याने पुनर्भरण करण्यासाठी वेगळय़ा स्वरूपाची सोय केली जाईल. कृत्रिम पद्धतीनेही पुनर्भरण करण्यात येईल, मराठवाडा व बुंदेलखंड या दोन्ही भागांत या उपाययोजना केल्या जातील. जाट यांनी सांगितले की, केंद्रीय भूजल आयोगाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक पाण्याच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आले होते. मराठवाडा व बुंदेलखंड भागात भूजल पातळी पाचशे फुटांच्या खाली गेल्याबाबत विचारले असता जाट यांनी सांगितले की, जानेवारी २०१६ अखेर मराठवाडय़ात भूजल पातळी ४५.६२ मीटर (१४० फूट) आहे, तर बुंदेलखंडमध्ये ४९.४ मीटर होती. आणखी एका प्रश्नावर त्यांनी सांगितले की, केंद्रीय भूजल मंडळाने जायकवाडी, भीमा, येलदरी व गिरणा या धरणांची पाहणी केली असून २१ एप्रिलअखेर पाणीसाठा शून्य असल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhima and manjara river joining project
First published on: 03-05-2016 at 01:28 IST