समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी उत्तर प्रदेशाच्या कन्नौज येथील गौरी शंकर महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली. मात्र, अखिलेश यादव मंदिरातून बाहेर पडताच भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हे मंदिर गंगाजलने स्वच्छ केल्याचं पुढे आलं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होतो आहे. यावरून उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – अखिलेश यादवांच्या मुलीने प्रचारसभांमध्ये वेधले लक्ष; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अदिती?

समाजवादी पक्षाकडून भाजपावर टीका :

या घटनेनंतर समाजवादी पक्षाचे नेते आय.पी. सिंह यांनी भाजपावर टीका केली आहे. अखिलेश यादव हे मागासवर्गीय आहेत. त्यामुळेच भाजपाने मंदिर परिसर गंगाजलने स्वच्छ केला, असे ते म्हणाले. तसेच मागास, दलित, वंचित आणि शोषित घटकांना हिंदू मंदिरात पूजा करण्याचा अधिकार मिळू नये, असे भाजपाचे मत आहे. त्यामुळे या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील जनता भाजपाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

पुढे बोलताना त्यांनी भाजपाकडून मुख्यमंत्री निवास गंगाजलने स्वच्छ केल्याच्या घटनेचीही आठवण करून दिली. योगी आदित्यनाथ पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हाही भाजपाने मुख्यमंत्री निवास गंगाजलने स्वच्छ केले होते. यावरूनच भाजपाची मानसिकता दिसून येते, असे ते म्हणाले.

हेही वाचा – अखिलेश यादवांची प्रतिष्ठा पणाला; गमावलेला गड परत मिळवण्यासाठी झुंज पण मतदारांचा कल भाजपाकडे?

भाजपाकडून स्पष्टीकरण :

दरम्यान, या प्रकरणावर आता भाजपाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. अखिलेश यादव यांनी मंदिराला दिलेल्या भेटीबाबत आमचा कोणाताही आक्षेप नाही. मात्र, यावेळी अखिलेश यादव यांच्याबरोबर काही मुस्लीम नेतेही मंदिरात दाखल झाले होते. त्यांनी बूट घालून मंदिर परिसरात प्रवेश केला. त्यामुळे आम्ही गंगाजलने मंदिर परिसर स्वच्छ केला, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष शिवेंद्र कुमार ग्वाल यांनी दिली. तसेच अखिलेश यादव हे निवडणुकी हिंदू आहेत. त्यांना निवडणूक आली की मंदिरांची आठवण येते, अशी टीकाही त्यांनी केली.