Pakistan Slogans : भारतात पाकिस्तानच्या बाजूने नारे देणाऱ्या फैजल निसारचं पापक्षालन झालं आहे. त्याला २१ वेळा भारतमाता की जय म्हणायला लावून आणि भारताच्या झेंड्याला सलाम करायला लावण्यात आला आहे. त्याच्या जामिनासाठी या अटी ठेवण्यात आल्या होत्या. ज्यानुसार त्याने २१ वेळा भारतमाता की जयचा नारा दिला आणि भारताच्या राष्ट्रध्वजाला सलाम केला.

तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तो भारतमाता की जय असा नारा देऊन २१ वेळा राष्ट्रध्वजाला सलाम करताना दिसतो आहे. फैजल निसारने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला २१ वेळा भारतमाता की जयची घोषणा देत तितक्या वेळाच सलाम करण्याची अट घातली आणि ते केल्यास तुला जामीन मिळेल असं सांगितलं. ही अट मान्य केल्यानंतर त्याला जामीन मिळाला.

नेमकं प्रकरण काय?

भोपाळ पोलिसांनी या वर्षी मे महिन्यात एका आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. हा आरोपी जाहीरपणे “पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा देत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. फैझान असं या आरोपीचं नाव असून तेव्हापासून तो पोलिसांच्याच ताब्यात आहे. दोन समाजांत तेढ निर्माण करणे व राष्ट्रीय ऐक्याला धोका पोहोचवणे या आरोपांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण तेव्हापासून त्याच्या खटल्याची सुनावणी पुढेच सरकली नसल्यामुळे तो पोलिसांच्याच ताब्यात होता.

आरोपी घोषणा देत असल्याचा पुरावा सादर

हा आरोपी घोषणा देत असल्याचा व्हिडीओ पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयासमोर केला आहे. मात्र, त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट येण्यासाठी उशीर लागत असल्यामुळे पोलिसांकडून न्यायालयाकडे मुदतवाढ मागण्यात आली. १७ सप्टेंबर रोजी भोपाळच्या फॉरेन्सिक सायबर सेलचे संचालक अशोक खाल्को न्यायालयासमोर हजर झाले. त्यांनी सांगितलं की, “सध्या फॉरेन्सिक सायबर लॅबकडे तब्बल ३ हजार ४०० प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यांची तपासणी करून लॅबकडून अहवाल सादर होणं अपेक्षित आहे. पण माझ्याकडे सध्या फक्त चारच कर्मचारी या कामासाठी आहेत”!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाची नेमकी अट काय?

आरोपी फैझलला जामीन मंजूर करताना न्यायालयाने अट घातली की त्यानं महिन्यातून दोन वेळा, अर्थात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान स्थानिक पोलीस स्थानकात हजेरी लावायची. यावेळी त्यानं पोलीस स्थानकाच्या वर फडकत असलेल्या तिरंग्याला २१ वेळा सॅल्युट करायचा. हे करताना ‘भारत माता की जय’ अशा घोषणा द्यायच्या आणि हे सगळं खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत आरोपीनं करत राहायचं, असे आदेश न्यायमूर्ती पालिवाल यांनी दिले आहेत. तसेच, याव्यतिरिक्त ५० हजारांच्या जातमुचलक्यावर आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला.