मध्य प्रदेशात १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी आदिवासी गौरव दिन साजरा केला जाईल. यावेळी पंतप्रधान मोदी भोपाळमध्ये पोहोचून जनसभेला संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून बांधण्यात आलेल्या हबीबगंज या पहिल्या रेल्वे स्थानकाचेही उद्घाटन ते करणार आहेत. दरम्यान, शिवराज सिंह चौहान सरकारने केंद्राला पत्र लिहून हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव आदिवासी राणी कमलापती यांच्या नावावर ठेवण्याची मागणी केली होती. राणी कमलापती या भोपाळच्या शेवटच्या गोंड राणी होत्या.

राज्य परिवहन विभागाने केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवलेल्या शिफारसपत्रात असे लिहिले आहे की, “भोपाळवर १६व्या शतकात गोंड शासकांचे राज्य होते आणि गोंड राणी राणी कमलापतीची स्मृती कायम ठेवण्यासाठी हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव राणी कमलापतींच्या नावावर ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे.” यापूर्वी, भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, प्रभात झा आणि मध्य प्रदेशचे माजी मंत्री जयभान सिंग पवैय्या यांच्यासह भाजप नेत्यांनी स्टेशनचे नाव माजी पंतप्रधान आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर ठेवण्याची मागणी केली होती.

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारची ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली असून हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव राणी कमलापती ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हणाले की, “भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव आदिवासी राणी राणी कमलापती यांच्या नावावर केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. त्या गोंड समाजाचे गौरव होत्या. त्या शेवटची हिंदू राणी होत्या.”

सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून बांधण्यात आलेल्या या रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.