Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख तथा भाजपाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल असलेला खटला पटियाला हाऊस न्यायालयाने सोमवारी बंद केला आहे. हा खटला एका अल्पवयीन कुस्तीगीरने दाखल केला होता.

या प्रकरणात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यानंतर सोमवारी पटियाला हाऊस न्यायालयाने पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. त्यामुळे आचा अर्थ असा की आता या प्रकरणात माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. या संदर्भातील वृत्त इंडिया टु़डेनी दिलं आहे.

दरम्यान, १५ जून २०२३ रोजी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात ५५० पानांचा अहवाल सादर केला होता. या अहवालात पोलिसांनी म्हटलं होतं की, या प्रकरणाच्या तपासा दरम्यान माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आलेले नाहीत. तसेच पोलिसांनी असंही नमूद केलं होतं की अल्पवयीन कुस्तीगीर आणि तिच्या वडिलांनी त्यांचे पूर्वीचे आरोप दंडाधिकाऱ्यांसमोर मागे घेतले आहेत.

या आधारावर पोलिसांनी पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल असलेला हा खटला बंद करण्याची शिफारस केली होती. पोलिसांनी याबाबत क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर त्याला न्यायालयाने मंजूरी दिली आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिलासा मिळाला. दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्यावर झालेले आरोप याआधीही फेटाळून लावले होते. तसेच या रोपांमागे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा त्यांनी केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतीक भूषण सिंह यांनी काय म्हटलं?

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील खटला न्यायालयाने बंद केल्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा प्रतीक भूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, “आम्हाला एका खोट्या आणि बनावट प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आम्हाला न्यायालयात न्याय मिळाला. प्रत्येक निराधार आरोप आता न्यायाच्या कठड्यात उधळले जात आहेत. हा सत्याचा विजय आहे”, असं प्रतीक भूषण सिंह यांनी म्हटलं आहे.