Bihar Assembly Election 2025 Narrow Victory Candidates: नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएने बाजी मारत २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपा ८९ जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आहे. त्यांनी ८५ जागा जिंकल्या आहेत. तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला अवघ्या २५ जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान काल झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ३ उमेदवारांनी १०० पेक्षा कमी मतांनी तर ३ उमेदवारांनी २५० पेक्षा कमी मतांनी विजय मिळवला आहे. सध्या या उमेदवारांची देशभरात चर्चा होत आहे.

भोजपूर जिल्ह्यातील संदेश मतदारसंघात अत्यंत अटीतटीची लढत झाली. यामध्ये संयुक्त जनता दलाचे उमेदवार राधा चरण साह यांनी राष्ट्रीय जनता दलाचे दीपू सिंह यांच्यावर केवळ २७ मतांनी विजय मिळवला.

सर्वात कमी मतांनी विजय मिळवणाऱ्या उमेदवारांमध्ये दुसऱ्या स्थानी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार सतीश कुमार सिंह यादव आहेत. त्यांनी रामगढ विधानसभा मतदारसंघातून ३० मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी भाजपाचे अशोक कुमार सिंह यांचा पराभव केला.

यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर भाजपाचे महेश पासवान आहेत. त्यांनी आरा येथील आगियां मतदारसंघातून अवघ्या ९५ मतांनी विजय मिळवत सीपीआय (एमएल) लिबरेशनचे शिवप्रकाश रंजन यांचा पराभव केला.

नबीनगर विधानसभा मतदारसंघात संयुक्त जनता दलाचे उमेदवार चेतन आनंद यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अमोद कुमार सिंह यांचा ११२ मतांनी पराभव केला.

राष्ट्रीय जनता दलाचे फैसल रहमान यांनी ढाका मतदारसंघातून फक्त १७८ मतांनी विजय संपादन केला. त्यांनी भाजपाचे पवन कुमार जयस्वाल यांचा पराभव केला.

फोर्ब्सगंज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मनोज बिश्वास यांनी भाजपाच्या विद्या सागर केसरी यांचा २२१ मतांनी पराभव केला.

भाजपा पहिल्यांदाच सर्वात मोठा पक्ष

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा पहिल्यांदाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ८९ जागा जिंकून भाजपाने एनडीएला मोठा विजय मिळवून दिला. एनडीएमधील त्यांच्या मित्रपक्षांनीही चांगली कामगिरी केली. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाने ८५ जागा जिंकल्या, तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) १९ जागा जिंकल्या. यासह एनडीएने एकूण २०२ जागांवर विजय मिळवला.