Bihar Assembly Election 2025 Election Commission : बिहार विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच विरोधक सातत्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर संशय व्यक्त करत आहेत. अशातच आता निवडणूक काळात मोठा गोंधळ उडाला आहे. बिहारमध्ये दोन दिवसांपूर्वी (६ नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, आज (८ नोव्हेंबर) समस्तीपूर येथील एका महाविद्यालयाजवळ रस्त्याच्या कडेला व्हीव्हीपॅट (VVPAT) स्लिप्स सापडल्या आहेत. यावरून राष्ट्रीय जनता दलाने निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितलं आहे. त्यानंतर निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर आला आहे. आयोगाने सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना (एआरओ) निलंबित केलं आहे.
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यामधील सरायगंज विधानसभा मतदारसंघातील केएसआर महाविद्यालयाजवळ ही घटना घडली आहे. एका रस्त्याच्या कडेला अनेक व्हीव्हीपॅट स्लिप्स (पावती) सापडल्या आहेत. विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने निवडणूक आयोग व निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने याप्रकरणी कारवाई केली आहे.
निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर
सदर घटना समोर येताच निवडणूक आयोगाने याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. समस्तीपूरमध्ये सापडलेल्या व्हीव्हीपॅट स्लिप्सची ओळख पटवण्याबाबत आदेश दिले आहेत. या मॉक पोलसाठी वापरलेल्या स्लिप्स असाव्यात असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी समस्तीपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
या घटनेवर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. आयोगाने समस्तीपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या मॉक पोलसाठी वापरलेल्या व्हीव्हीपॅट स्लिप्स असून यामुळे मतदान प्रक्रियेची अखंडता, विश्वासार्हता कायम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाबद्दल निलंबित करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
यावर समस्तीपूरचे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोशन कुशवाहा म्हणाले, “सरायगंज विधानसभा मतदारसंघात काही व्हीव्हीपॅट स्लिप्स सापडल्याचं वृत्त आम्हाला मिळालं. त्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊन तपासणी केली. या स्लिप्स कमिशनिंग अँड डिस्पॅच सेंटरमध्ये सापडल्या आहेत. या मॉक पोलसाठी वापरलेल्या स्लिप्स आहेत.”
