Bihar Assembly Election Election 2025 Bhagirath Manjhi : ‘माउंटन मॅन’ म्हणून ओळखले जाणारे दशरथ मांझी यांचे पुत्र भागीरथ मांझी यांना बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील नाराजी उघड केली आहे. भागीरथ मांझी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला संयुक्त जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जून २०२५ मध्ये राहुल गांधी यांनी मांझी यांच्या गेहलोर या गावी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

या भेटीनंतर मांझी यांनी सांगितलं होत की राहुल गांधी यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे की ते विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार म्हणून त्यांचा विचार करतील. भागीरथ मांझी म्हणाले होते की “राहुल गांधी आमच्या मातीच्या झोपडीत आले आणि मला काँग्रेसकडून विधानसभेचं तिकीट देण्याचं आश्वासन दिलं.” भागीरथ मांझी यांनी नुकतीच रेडिफला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसवरील नाराजी जाहीर केली.

काँग्रेसकडून तिकीट का मिळालं नाही?

यावेळी भागीरथ मांझी यांना विचारण्यात आलं की तुम्हाला बिहार विधानसभेसाठी काँग्रेसकडून तिकीट का मिळालं नाही? यावर ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी मला तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही. आम्हाला राहुल गांधींवर विश्वास होता. मात्र, त्यांनी विश्वासघात केला आहे. मला एक गोष्ट कळत नाही की मला राहुल गांधी यांनी आश्वासन दिलेलं असताना काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी माझ्या नावाचा विचार का केला नाही.”

काँग्रेसने तिकीट द्यावं यासाठी काही प्रयत्न केलात का? की राहुल गांधींच्या आश्वासनावर विश्वास ठेवून घरी बसून तिकीट मिळण्याची प्रतीक्षा करत होतात?

“हो, मी प्रयत्न केले. मी कुठेही कमी पडलो नाही. मी काही दिवस दिल्लीत मुक्काम ठोकला होता. आवश्यक कागदपत्रांसह मी काँग्रेस मुख्यालयात गेलो होतो. त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना मी भेटलो होतो. दिल्लीत असताना मी राहुल गांधी यांना भेटण्याचा दोनदा प्रयत्न केला. त्यांच्या निवासस्थानी दोन वेळा भेट दिली. मात्र, माझी व राहुल गांधींची भेट होऊ शकली नाही.”

“सप्टेंबर महिन्यात ते पाटण्यातील काँग्रेस मुख्यालयात येणार होते. मी तिकडे धाव घेतली. मात्र, तिथेही माझी त्यांच्याबरोबर भेट होऊ शकली नाही. त्यानंतर मी बिहार काँग्रेस अध्यक्ष राजेश राम व राज्य काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्लावरू यांना भेटलो. दोघांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. माझा अर्ज दिल्तील काँग्रेस हाय कमांडकडे पाठवण्याचं आश्वासनही दिलं.”

तुम्हाला काँग्रेसकडून तिकीट का मिळालं नाही?

“भगीरथ मांझी हा एक गरीब माणूस आहे. त्याच्याकडे साधनसंपत्ती नाही. कुठल्याही गरिबाला एखाद्या पक्षाकडून निवडणुकीचं तिकीट मिळवणं अवघड असतं. तरी मी निराश झालो नाही, कारण मी आशावादी होतो. मला वाटत होतं राहुल गांधी त्यांचं आश्वासन पूर्ण करतील. मी गयामधील बाराचट्टी विधानसभा मतदारसंघातून (अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ) निवडणूक लढवण्यास इच्छूक होतो. या मतदारसंघात माझ्या मुसाहर जातीची मोठी संख्या आहे.”