पीटीआय, नवी दिल्ली
बिहार विधानसभा निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी चर्चा केली. या निवडणुकीत काँग्रेस घटक पक्ष असलेल्या महागठबंधनचा दारूण पराभव झाला आहे. खरगे आणि राहुल यांच्या बैठकीत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. निवडणुकांचे निकाल अविश्वसनीय असून याबाबत काही आठवड्यांत पुरावे सादर करणार असल्याचेदेखील बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, पक्षाचे खजिनदार अजय माकन आणि बिहारचे प्रभारी कृष्णा अल्लावरू उपस्थित होते. काँग्रेसने बिहारमध्ये ६१ जागा लढविल्या, त्यापैकी त्यांना केवळ सहा जागांवरच विजय मिळाला. पक्षाची बिहारमधील २०१०पासूनची ही सर्वात वाईट कामगिरी आहे. दरम्यान, या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संशयास्पद होती आणि त्यात पारदर्शकतेचा अभाव होता. बिहार निवडणुकीचे हे निकाल आपल्या सर्वांसाठी अविश्वसनीय आहेत. बिहारची जनता आणि आघाडीतील भागीदारांच्ही यावर विश्वास नाही. एका राजकीय पक्षाचा विजयाचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक आहे, हे यापूर्वी कधीही घडले नव्हते. – के.सी. वेणुगोपास, सरचिटणीस, काँग्रेस
‘एसआयआर’नंतर तीन लाख मतदारांची भर – आयोग
बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीनंतर (एसआयआर) अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बिहारच्या मतदार यादीत ३ लाख मतदारांची भर पडली, असे प्रत्युत्तर निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या आरोपांवर दिले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करणाऱ्या आयोगाच्या निवेदनात मतदारांची संख्या ७.४२ कोटी असल्याचे म्हटले आहे, तर त्यानंतरच्या निवेदनांमध्ये ही संख्या ७.४५ कोटी होती, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले होते. दोन्ही टप्प्यांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या १० दिवस आधीपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व वैध अर्जांची छाननी केल्यानंतर, नियमांनुसार पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली, असे आयोगाने नियमांचा दाखला देत म्हटले.
एसआयआरला भाजपचा फायदा
दरम्यान, एसआयआर आणि बोगस मतदारांना काढून टाकल्यामुळे बिहारमध्ये रालोआचा मोठा विजय झाला, असे मत भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केले. आतापर्यंत काँग्रेस आणि राजदसारख्या पक्षांना बोगस मतदारांमुळे विजय मिळत होता, असा दावाही त्यांनी केला.
चिराग पासवान फोटो ओळ
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) बिहारमधील नवीन सरकारमध्ये सामील होण्यास उत्सुक असल्याचे शनिवारी सांगितले. त्यांनी शनिवारी नितीश कुमार यांची भेट घेतली व त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छाही चिराग यांनी व्यक्त केली.
