नवी दिल्ली : बिहारमध्ये राबवलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) उपक्रमानंतर राज्यातील अंतिम मतदारयादी मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यापाठोपाठ पुढील महिन्यात राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्याच्या विधानसभेची मुदत २२ नोव्हेंबरला संपत आहे.
निवडणूक आयुक्त ४ आणि ५ ऑक्टोबरला पाटण्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. बिहारचा सर्वात मोठा सण असलेली छठपूजा ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पूजा पार पडल्यानंतर निवडणुकीचा पहिला टप्पा होण्याची शक्यता आहे.
२४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभा निवडणूक आणि काही विधानसभा पोटनिवडणुकांसाठी ४७० निरीक्षक तैनात केले जात आहेत. सामान्य निरीक्षक, पोलीस आणि खर्चावर देखरेख ठेवणारे निरीक्षक यांना ३ ऑक्टोबरला मार्गदर्शन केले जाणार आहे. यापूर्वीची विधानसभा निवडणूक करोना महासाथीच्या सावटाखाली, तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती.