पाटणा : बिहारमध्ये एक कोटी युवकांना रोजगार, एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचे आश्वासन यासह चार शहरांमध्ये मेट्रो रेल्वे आणि सात आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी भरगच्च आश्वासने देणारा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) जाहीरनामा शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. पायाभूत सुविधा, उद्योग आणि शिक्षण यावर सत्ताधारी रालोआने विशेष भर दिल्याचे दिसून येत आहे.

पाटण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रालोआचा ६९ पानी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान, जितन राम मांझी, चिराग पासवान आणि घटक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. राज्यात सात द्रुतगती मार्ग, प्रत्येक जिल्ह्यात १० औद्योगिक वसाहती, केजीपासून पदव्युत्तर दर्जेदार मोफत शिक्षण आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपयांचा साहाय्यता निधी अशी आश्वासने मतदारांना देण्यात आली आहेत.

रालोआ पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात जागतिक दर्जाची वैद्यकीय नगरी, प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय, रेशन दुकानावर मोफत धान्य, पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि राज्यात आणखी ५० लाख पक्की घरे बांधण्याच्या आश्वासनांचा जाहीरनाम्यात समावेश आहे. सीतामढी जिल्ह्यातील सीतेचे जन्मस्थान समजल्या जाणाऱ्या पुनौरा धाम जानकी मंदिराचे नामकरण सीतापुरम केले जाईल असे आश्वासन रालोआने दिले आहे.

इतर वचने

– कौशल्याधारित रोजगाराला चालना देण्यासाठी कौशल्य जनगणना, प्रत्येक जिल्ह्यात महा कौशल्य केंद्रांची स्थापना

– मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत महिलांना दोन लाख रुपयांपर्यंत वित्तीय साहाय्य

– अतिमागास वर्गासाठी (ईबीसी) विविध व्यावसायिक गटांना १० लाख रुपयांचे वित्तीय साहाय्य

– प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सध्याच्या वार्षिक ६,००० रुपये निधीऐवजी ९,००० रुपये, मच्छीमारांना वार्षिक ४,५०० रुपये निधीऐवजी ९,००० रुपये

– सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत

– राज्याच्या प्रत्येक विभागात क्रीडानगरी, प्रत्येक जिल्ह्यात नवीन १० औद्योगिक वसाहती आणि एक कारखाना

– १०० सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग केंद्रे, ५० हजारांपेक्षा जास्त कुटीर उद्योग, संरक्षण कॉरिडॉर

– पाटण्यासह इतर चार शहरांमध्ये मेट्रो रेल्वे

हा जाहीरनामा शेतकऱ्यांचे कल्याण, युवकांना रोजगार, महिलांचे सक्षमीकरण, पायाभूत सुविधांचा विकास, नवीन उद्योगांची स्थापना आणि विकसित व स्वावलंबी बिहारच्या उभारणीप्रति आमच्या कटिबद्धतेचा दस्तऐवज आहे. – जे. पी. नड्डा, अध्यक्ष, भाजप