‘संसारास उद्ध्वस्त करी दारू, दारूस स्पर्श नका करू’ अशी एक जाहिरात पूर्वी दूरदर्शनवर लागायची. तिथपासून करोना काळात ‘अर्थव्यवस्थेचा उद्धार करणारी दारू’पर्यंतचा प्रवास आपण केला आहे. या काळात इतर सर्व बाबी बंद असताना आर्थिक बाजू सावरण्यासाठी दारूची दुकानं सर्वात आधी सुरू करण्यात आल्याचं दिसून आलं. मात्र, दारूचे वाईट परिणाम सातत्याने अधोरेखित होतच गेले. नुकतीच बिहारमध्ये अवैध दारू प्यायल्यामुळे ४० व्यक्तींचा मृत्यू ओढवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणावरून बिहार सरकार अनेकांच्या निशाण्यावर असताना आता बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. लोक दारू का पितात, हे आपल्याला माहिती नसल्याचं नितीश कुमार म्हणाले आहेत.

अवैध दारू प्यायल्याने बिहारमध्ये ४० मृत्यू

बिहारमध्ये घेण्यात आलेल्या दारूबंदीच्या निर्णयाचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अवैध दारूमुळे घडत असलेल्या दुर्दैवी घटनांबाबत माध्यमांनी विचारणा करताच नितीश कुमार यांनी याविषयी भाष्य केलं आहे.

“दारू प्यायल्यास लोकांचा मृत्यू ओढवू शकतो. तो एक वाईट प्रकार आहे. मला कळत नाही लोक दारू का पितात”, असं नितीश कुमार म्हणाले आहेत. दारूबंदीच्या निर्णयावरून नितीश कुमार यांच्या सरकारवर गेल्या काही दिवसांपासून टीका केली जात आहे. त्यामुळे या निर्णयाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तेव्हा विरोध का नाही केला?”

दरम्यान, या निर्णयासाठी टीका करणाऱ्यांवर देखील नितीश कुमार यांनी निशाणा साधला आहे. “ते ही गोष्ट विसरले आहेत का की हा निर्णय सगळ्यांच्या संमतीनंतरच घेण्यात आला आहे? सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष असा कोणत्याही पक्षाने तेव्हा या निर्णयाला विरोध का केला नाही?” असा सवाल देखील नितीश कुमार यांनी केला आहे. “या निर्णयाची योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याचं उल्लंघन रोखण्यासाठी आम्ही त्यातल्या चुका शोधून काढण्याचा प्रयत्न करू”, असं देखील नितीश कुमार म्हणाले.