नवी दिल्ली, मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत बिगरभाजप पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. दुसरीकडे, राज्यातही महाविकास आघाडी बळकट करण्याच्या हालचाली सुरू असून, नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे.

काँग्रेसने हिरवा कंदिल दिल्यानंतर विरोधकांच्या एकजुटीसाठी पुढाकार घेऊ, अशी भूमिका जनता दलाचे (संयुक्त) प्रमुख नितीशकुमार यांनी मांडली होती. त्यानुसार बुधवारी खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीवर मतैक्य झाले. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचे खरगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, काँग्रेसप्रणित महाआघाडीला आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आदींनी कडाडून विरोध केला आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसला वगळून  तिसऱ्या आघाडीचा घाट घातला होता. या वास्तवाची जाणीव असल्यामुळे नितीशकुमार यांनी, ‘‘अधिकाधिक पक्षांशी संवाद साधून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल’’, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Pooja tadas and ramdas tadas
सासऱ्याविरोधात सून! कौटुंबिक अत्याचाराचा आरोप केलेल्या पूजा तडस निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ पक्षाने दिली संधी
indira gandhi tried to end democracy says devendra fadnavis
इंदिरा गांधींकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस यांची टीका
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला
INDIA Bloc Maharally
विरोधकांचे शक्तिप्रदर्शन! पंतप्रधानांचे मॅचफिक्सिंग : राहुल गांधी, फ्लॉप शो : भाजपची सभेवर टीका

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात खरगेंनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन, शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींशी फोनवरून संपर्क केला होता. त्याचा उल्लेखही नितीशकुमार यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘‘खरगेंनी काही विरोधी पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे. आज झालेल्या चर्चेच्या आधारे विरोधकांच्या ऐक्याची प्रक्रिया पुढे नेली जाईल. सहमत होणाऱ्या पक्षांशी सविस्तर चर्चा केली जाईल. त्यासाठी आम्ही पुन्हा बैठक घेणार आहोत’’, असे नितीशकुमार म्हणाले. किती बिगरभाजप पक्ष सहभागी होतील, या प्रश्नावर, ‘बैठकीवेळी कळेलच’, असे उत्तर नितीशकुमार यांनी दिले. बैठकीला राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित होते.

राज्यातही गेल्या दोन दिवसांत महाविकास आघाडीत घडामोडींना वेग आला आहे. अदानी चौकशीवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलेल्या वेगळय़ा भूमिकेवरून काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना थेट प्रत्युत्तर दिल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र होते. पण, मंगळवारपासून विरोधी आघाडीतील मतभेद दूर व्हावेत या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये विरोधी पक्षांचे ऐक्य आणि महाविकास आघाडीतील मतभेद मिटविण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी तुटेपर्यंत ताणू नये आणि मतभेद जनतेसमोर येऊ नयेत, या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी उभयतांनी भूमिका घेतली. काँग्रेसनेही पवारांवर टीका करू नये, अशी चर्चा ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी केल्याचे समजते.

स्वातंत्र्यवीर सावरकर मुद्दय़ावर शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी राहुल गांधी यांनाच इशारा दिल्याने काँग्रेसमध्येही शिवसेनेबद्दल नाराजीची भावना होती. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत निर्माण झालेला तणाव निवळण्यावर भर देण्यात आला आहे. महाविकास आघाडीत सौहार्दाचे वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले. पण केवळ शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्दय़ावर भेट झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

दिवसभरात..

* बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा.

* नितीशकुमार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांचीही भेट घेऊन त्यांना भाजपविरोधी आघाडीत सहभागाचे आवाहन केले.

* भाजप धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत असून, भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे माकप नेते सीताराम येचुरी यांचे आवाहन. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपविरोधी आघाडीच सत्ता स्थापन करेल, असा येचुरींचा विश्वास.

अन्य पक्षांशी संवाद साधण्याचे आव्हान

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आघाडी न करता स्वतंत्रपणे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी काँग्रेस आणि भाजपपासून दूर राहण्याचे ठरवले आहे. बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, भारत राष्ट्र समिती या पक्षांची काँग्रेसच्या महाआघाडीत दाखल होण्याची तयारी नाही. ‘तेलुगू देसम’चे चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न केले होते. यावेळी मात्र, ते तटस्थ आहेत. या वेगवेगळय़ा प्रादेशिक पक्षांशी संवाद कसा साधला जाणार, हे खरगे व नितीशकुमार यांच्या बैठकीतून स्पष्ट झालेले नाही.

उद्धव ठाकरे -के. सी. वेणुगोपाळ भेट आज

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ हे गुरुवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत येणार आहेत. राहुल गांधी वा काँग्रेसने सावरकरांचा मुद्दा उपस्थित करू नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. अर्थात, राहुल गांधी ती मान्य करतील का, याबद्दल राज्यातील काँग्रेस नेते साशंक आहेत. मात्र, शरद पवार- उद्धव ठाकरे यांची झालेली भेट आणि काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाळ यांच्या गुरुवारच्या मुंबई दौऱ्यातून महाविकास आघाडी बळकटीकरणास मदतच होईल, असे आघाडीच्या नेत्यांचे मत आहे.

विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी उचललेले हे ऐतिहासिक पाऊल आहे. सध्या घटनात्मक संस्थांवर आक्रमण होत असून, त्याविरोधात आम्ही एकत्रितपणे लढा देऊ.

-राहुल गांधी, काँग्रेस नेते