CM Nitish Kumar Photo On Womans Voter ID : महत्त्वाच्या कागदपत्रांवर नाव किंवा पत्ता अशी माहिती चुकीची छापली गेल्याच्या घटना अनेकदा निदर्शनास येतात. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बिहारमध्ये असाच एक मजेशीर प्रकार समोर आला आहे. येथे एका ३० वर्षीय महिलेच्या मतदार ओळखपत्रात विचित्र गोंधळ झाल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये उमेदवाराच्या नावाच्या जागी अभिलाषा कुमारी असं लिहून आलं आहे, पण फोटोच्या जागी मात्र चक्क बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा फोटो छापण्यात आला आहे.

नेमकं झालं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला संबंधित अधिकार्‍यांकडे तिच्या ओळखपत्रावर देण्यात आलेला चुकीचा पत्ता दुरूस्त करून घेण्यासाठी गेली होती. त्यांनी ही दुरुस्ती केली पण दुसरी एक चूक करून ठेवली. अभिलाषा कुमारी या बिहारच्या मधेपुरा नगर परिषदेतील रहिवासी आहेत आणि त्यांना नुकतेच त्यांचे सुधारित मतदार ओळखपत्र मिळाले आहे. या ओळखपत्रावर त्यांचे नाव आणि इतर माहिती तर बरोबर लिहिण्यात आली आहे, पण फोटो मात्र बिहारच्या मुख्यमंत्र्‍यांचा लावण्यात आला आहे.

“माझ्या मतदान ओळखपत्रात दुरूस्तीसाठी मी अर्ज केला होता , पण पोस्टाने जेव्हा मला ते मिळाले, तेव्हा त्यावर बिहारच्या मुख्यमंत्र्‍यांचा फोटो होता,” असे अभिलाषा कुमारी यांनी सांगितले. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. दरम्यान हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होते आहे.

तर या महिलेचा पती चंदन कुमार याने एजन्सीवर निष्काळजीपणाचा आरोप केला आणि एका महिलेच्या कार्डवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो येणे ही एक मोठी चूक असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

“कार्डवर सर्वकाही ठीक होते, पण फोटो नितीश कुमार यांचा होता. यातून सरकारच्या बाजूने होणारा निष्काळजीपणा दिसून येतो, ही एक मोठी चूक आहे. अशा चुकीमधून मतदार ओळखपत्र तयार करणाऱ्या एजन्सी किंवा कर्मचाऱ्याचा निष्काळजीपा दिसून येतो” असे चंदन कुमार म्हणाले. याबरोबरच त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली.

तसेच चंदन कुमार यांनी नितीश कुमार यांचा फोटो निवडल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केला. मतदार ओळखपत्रावर लावण्यात आलेल्या नितीश कुमार यांच्या फोटोमध्ये ते उन लागू नये डेळ्यांवर हात धरताना दिसत आहेत. “त्यांनी संपूर्ण प्रक्रियेची खिल्ली उडवली आहे,” असेही चंदन कुमार म्हमाले.

दरम्यान या जोडप्याने असाही दावा केला आहे की ते याबाबत संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (बीएसओ)कडे देखील गेले होते, या अधिकाऱ्याने हे कोणालाही सांगू नका असे सांगितल्याचा या जोडप्याने आरोप केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आाल आहे, यादरम्यान विरोधी पक्षांनी ही संधी साधून सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.