बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात लोकसंख्या वाढीवरून केलेल्या विधानामुळे राजकारण तापलं आहे. महिला सुशिक्षित झाली तर ती लोकसंख्या वाढ रोखू शकते. आम्ही पुरुष कुटुंब नियोजनावर फार लक्ष देत नाही, अशा आशयाचं विधान नितीश कुमार यांनी केलं आहे. ते वैशाली येथे आयोजित केलेल्या ‘समाधान यात्रे’त बोलत होते.

संबंधित कार्यक्रमात नितीश कुमार म्हणाले, “जेव्हा महिला शिक्षित होतील, तेव्हा लोकसंख्येचा दर कमी होईल. आम्ही पुरुष दररोज लैंगिक संबंध ठेवतच असतो. आपल्याला दररोज बाळ जन्माला घालायचं नाहीये, यावर आमचं फारसं लक्ष नसतं. पण जेव्हा महिला सुशिक्षित बनते, तेव्हा ती स्वत:ला गरोदर राहण्यापासून सुरक्षित कसं ठेवायचं, हे तिला समजतं” असं विधान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं आहे.

हेही वाचा- “सगळे घाव झेलायला ताई आणि मलाई खायला…”, पंकजा मुंडेंबाबत प्रीतम मुंडेंचं मोठं विधान!

नितीश कुमार यांच्या विधानावर भाजपासह इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. भाजपाचे सरचिटणीस नितीश आनंद यांनीही नितीश कुमारांवर टीकास्त्र सोडलं. नितीश कुमारांचं विधान ‘लिंगभेदी’ (Sexist) असल्याचं म्हटलं. त्यांनी संबंधित कार्यक्रमाचा व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये हिंदी भाषेतून लिहिलं,”महिलांनी अभ्यास केला पाहिजे… ते ठीक आहे, परंतु पुरुषांची बदनामी का करायची?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा नेते अमित मालवीय यांनीही नितीश कुमारांना उपरोधिक टोला लगावला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “हे खरे आहे की सुशिक्षित स्त्रिया त्यांच्या शरीराबाबत अधिक जागरूक असतात आणि कुटुंब नियोजनाच्या बाबतीतही त्या सजग असतात. पण मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार हे अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकले असते. याचा दुसरा अर्थ असाही असावा की जनता दल (संयुक्त) सर्व समाजातील महिलांसाठी विवाहयोग्य वय २१ पर्यंत वाढवण्याचं समर्थन करत आहे.”