Rahul Gandhi In Bihar: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाला सातत्यानं लक्ष्य करत आहेत. मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेच्या आरोपांवरून निवडणूक आयोगावर आणि भारतीय जनता पक्षावर मत चोरीचा आरोप करत राहुल गांधी घणाघाती टीका करत आहेत. या संदर्भात काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेत काही पुराव्यांचंही सादरीकरण केलं होतं. तेव्हापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

दरम्यान, यातच राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रा’ काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव बिहारच्या विविध शहरात जात सभा आणि मेळावे घेत आहेत. आज बिहारच्या पूर्णिया-अरारिया मार्गावर व्होटर अधिकार यात्रेत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीचं नेतृत्व राहुल गांधी करत होते. यावेळी राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं पाहायला मिळालं.

बाईक रॅली सुरू असताना एका व्यक्तीने अचानक राहुल गांधींच्या बाईक जवळ जाऊन राहुल गांधी यांना मिठी मारली आणि गालावर चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, लगेच सुरक्षा रक्षकाने त्या व्यक्तीला तात्काळ बाजूला ओढलं आणि जोरात कानशिलात लगावली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

तेजस्वी यादवांच्या लग्नाचा सल्ल्यानंतर राहुल गांधींच्या वक्तव्याची चर्चा

राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची ‘व्होटर अधिकार यात्रा’ रविवारी बिहारच्या अररिया या ठिकाणी पोहोचली असता त्यांनी पत्रकार परिषद घेत संबोधित केलं. मात्र, यावेळी झालेल्या एका हलक्याफुलक्या विनोदाची चांगलीच चर्चा रंगली आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संबोधित केलं. यावेळी आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यावर टीका केली.

चिराग पासवान यांच्याबद्दल बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “चिराग पासवान हा आजच्या चर्चेता मुद्दा नाही. पण तरीही त्यांना मी एक सल्ला नक्कीच देईन, कारण ते आमचे मोठे बंधू आहेत. चिराग पासवान यांनी लवकरात लवकर लग्न करावं”, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं.

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी चिराग पासवान यांना दिलेल्या लग्नाच्या सल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची एकच चर्चा रंगली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, “हा सल्ला मलाही लागू होतो.” दरम्यान, राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.