मतदानोत्तर चाचण्यांत राजद-जदयू महाआघाडीला कल * रालोआला धक्का बसण्याची चिन्हे
ऐन दिवाळीच्या तोंडावर जाहीर होणार असलेल्या बिहार विधानसभा निवडणूक निकालांत बिहारची सूत्रे पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्याकडेच जाण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी बिहारमधील मतदानाचा पाचवा व अखेरचा टप्पा संपल्यानंतर जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांमध्ये मतदारांनी जदयू-राजद महाआघाडीलाच सर्वाधिक पसंती दिल्याचा कल स्पष्ट झाला आहे. तर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. मात्र, असे असले तरी रालोआला सन्मानजनक आकडा गाठता येईल, असेही मतदानोत्तर चाचण्यांमध्ये स्पष्ट होत आहे.
२४३ जागांच्या बिहार विधानसभेसाठीच्या मतदानाची प्रक्रिया गुरुवारी समाप्त झाली. त्यानंतर विविध वृत्तवाहिन्या व सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्याचे निष्कर्ष जाहीर झाले. त्यात बहुतेकांनी पुन्हा एकदा नितीशकुमारंकडेच सत्तेची सूत्रे येतील, असा अंदाज वर्तवला आहे. तर ‘टुडेज् चाणक्य’ या संस्थेने रालोआला २४३ पैकी १५५ जागांसह स्पष्ट बहुमत मिळेल, असे भाकीत केले आहे. निवडणुकीतील शेवटच्या दोन टप्प्यांत सर्वाधिक मतदान झाले.
अल्पसंख्याकबहुल भागात झालेल्या या मतदानाचा लाभ भाजपला होणार असल्याचा दावा ‘टुडे्ज चाणक्य’ने केला आहे. त्यामुळे भाजप, लोजप, रालोसपा व हिंदुस्तान अवाम मोर्चा या रोलाआतील घटक पक्षांना एकत्रितपणे १५५ जागा मिळणार असल्याची शक्यता ‘टुडे्ज चाणक्य’ने वर्तवली आहे.
तूरडाळीची फोडणी
गोमांस ते आरक्षण अशा धार्मिक-सामाजिक मुद्दय़ांभोवती केंद्रित झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला महागडय़ा तूरडाळीची फोडणी होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व तब्बल डझनभर केंद्रीय मंत्र्यांचा ताफा भाजपकडून मैदानात होता. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उत्तर भारतातील राजकीय व जातीयदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या राज्यात निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांवर प्रतिक्रिया देण्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नकार दिला.

