गेल्या आठवड्यात २ जून रोजी ओडिशामध्ये रेल्वेचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात २८८ लोकांचा बळी केला तर १,१०० हून अधिक लोक जखमी झाले. एकीकडे या घटनेतून देश अजून सावरलेला नाही तोवर काही भामटे या दुर्घटनेतही स्वतःचा लाभ कसा होईल यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. असाच एक भामटा अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला आहे. रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेने नुकसानभरपाई जाहीर केल्यानंतर कोणी जिवंत व्यक्तीला मृत सांगून लाभ घेण्याचा प्रयत्न करतंय, तर कोणी अनेक वर्षांपूर्वी मरण पावलेल्या नातेवाईकाच्या नावाने सरकारची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतंय. परंतु रेल्वेचे अधिकारीही सावध आहेत. हे अधिकारी असे खोटे दावे करणाऱ्या लोकांचा पर्दाफाश करताना दिसत आहेत.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बिहारमधील एका भामट्याचा पर्दाफाश केला आहे. या व्यक्तीने २०१८ मध्ये निधन झालेल्या त्याच्या आईचा कोरोमंडल रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचून सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्याने नुकसानभरपाईचा दावा केला होता. यासाठी तो रेल्वेमंत्र्यांना भेटायला तो दिल्लीला गेला होता.

हा भामटा रेल्वेमंत्र्यांच्या निवासस्थानी गेला होता. तसेच तो रेल्वे भवनातही गेल्याची माहिती मिळाली आहे. याचं नाव संजय कुमार असं असून तो मूळचा बिहारचा आहे. संजय कुमार जेव्हा रेल्वेमंत्र्यांच्या घरी गेला तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याला रेल्वे भवनाशी संपर्क साधण्यास सांगितलं. त्यानंतर त्याने रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला. परंतु यावेळी त्याने वेगळीच माहिती दिली. दोन वेळा त्याने निवेदन बदलल्यामुळे अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देऊन चौकशी केली तसेच माहिती गोळ्या केल्यावर हा भामटा फसवणूक करण्याचा प्रयत्न करतोय हे त्यांच्या लक्षात आलं.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपीने आधी सांगितलेलं, त्याच्या आईचा कोरोमंडलं रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. आम्ही त्याच्याकडे रेल्वे प्रवासाचा पुरावा मागितला तर त्याच्याकडे काहीच नव्हतं. त्याच्याकडे तिकीटही नव्हतं. यावर तो म्हणाला मी एका ट्रॅव्हल एजंटद्वारे तिकीट बूक केलेलं. परंतु मला आता त्याचं नाव आठवत नाहीये. त्याची आई कोणत्या डब्यातून प्रवास करत होती, किंवा ती वेटिंग लिस्टमध्ये होती का अशा कोणत्याही प्रश्नाचं तो उत्तर देऊ शकला नाही.

हे ही वाचा >> “औरंगजेब याच मातीतला”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे आईचा फोटो मागितला. हा फोटो घेऊन अधिकाऱ्याने रेल्वेचा अपघात होण्यापूर्वी जिथे जिथे रेल्वे थांबली होती. तिथलं सीसीटीव्ही फुटेज फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तपासलं. परंतु कोणत्याही रेल्वे स्थानकावर त्याच्या आईची माहिती मिळाली नाही. अधिकाऱ्यांनी त्याचा खोटा बनाव पकडल्यावर त्याने कबूल केलं की, त्याच्या आईचं पाच वर्षांपूर्वी निधन झालं आहे. तो बेरोजगार असल्याने नोकरी आणि नुकसानभरपाईची रक्कम मिळवण्यासाठी हे सगळं करत होता.