Bihar Assembly Election MP Shambhavi Chaudhary: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील १२१ जागांसाठी मतदान पार पडले. मतदान होण्याच्या एक दिवस आधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या गडबडीबाबत मोठे आरोप केले. त्यानंतर आता बिहारच्या निवडणुकीत एका खासदाराने दुबार मतदान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) एनडीएचा मित्रपक्ष आहे. या पक्षाच्या खासदार शांभवी चौधरी यांनी बुधवारी मतदान केल्यानंतर दोन्ही हातांच्या बोटांना शाई असल्याचे दाखवले.
शांभवी चौधरी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. एएनआय वृत्तसंस्थेनेही हा व्हिडीओ शेअर केला आहे. मतदान करून बाहेर आल्यानंतर खासदार शांभवी चौधरी उजव्या हाताच्या बोटावर शाई लावली असल्याचे दाखवतात. पण इतर लोकांनी डावा हात दाखवल्याचे पाहून त्या लगेच त्यांचा डावा हात वर करतात. तेव्हा त्यांच्या डाव्या हाताच्या बोटालाही शाई लावल्याचे दिसले.
खासदार शांभवी चौधरी यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर दोन वेळा मतदान केल्याचा आरोप केला आहे.
बुधवारी एका मतदानकेंद्राबाहेर चित्रित केलेल्या व्हिडीओमध्ये २७ वर्षीय शांभवी चौधरी त्यांचे वडील आणि जद(यू) नेते अशोक चौधरी आणि आई नीता चौधरी यांच्यासह माध्यमांना मतदान केल्याची पोज देत होते. बुद्ध कॉलनीतील सेंट पॉल स्कूलमध्ये मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांना शाई लावलेले बोट दाखवले. मात्र दोन्ही हातावरील शाई दाखवल्यामुळे आता शांभवी चौधरी यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
काँग्रेसने या व्हिडीओतील फोटोंचा स्क्रिनशॉट काढत ‘दोन्ही हातांनी वोट चोरी’ असे कॅप्शन देऊन टीका केली आहे. काँग्रेससह आरजेडीनेही खासदार शांभवी चौधरी यांच्या व्हायरल व्हिडीओवर टीका केली आहे.
राष्ट्रीय जनता दलाच्या प्रवक्त्या कांचन यादव यांनी एएनआयचा व्हिडीओ शेअर केला. ज्यात त्यांनी म्हटले की, हा एक वेगळ्याच स्तरावरचा घोटाळा सुरू आहे. लोजप पक्षाच्या खासदार शांभवी चौधरी यांच्या दोन्ही हातांच्या बोटांवर शाई लागली आहे. म्हणजे यांनी दोन वेळा मतदान केले. जेव्हा त्यांनी चुकीचा हात दाखवला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सावध केले. निवडणूक आयोगाला आमचा प्रश्न आहे, हे काय चालू आहे? याची चौकशी कोण करणार?
निवडणूक आयोग किंवा खासदारांकडून अद्याप भूमिका अस्पष्ट
दरम्यान या व्हायरल व्हिडीओनंतर खासदार शांभवी चौधरी किंवा निवडणूक आयोगाने कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही. मतदान करत असताना भारतात सामान्यतः मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावली जाते. जर मतदाराने चुकून उजवा हात पुढे केला तर संबंधित अधिकारी ती चूक दुरूस्त करतात. यामुळे दुबार मतदान झाले आहे, हे सिद्ध होत नाही.
बिहारमध्ये १२१ विधानसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्याचे मतदान ६ नोव्हेंबर रोजी झाले. ११ नोव्हेंबर रोजी उर्वरित १२२ मतदारसंघासाठी मतदान होईल. तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.
