बिहारमधील दरभंगा विभागात अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळवून देणारी ‘जहांगीरची  घंटा’ पुन्हा वाजणार आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात या जहांगीरच्या अन्यायनिवारक घंटा बसवल्या जाणार असून जी व्यक्ती संकटात असेल तिने केव्हाही ही घंटा वाजवली तर तिला न्याय मिळेल अशी ही संकल्पना आहे, जी पूर्वीचा राजा जहांगीरने राबवली होती. दरभंगाचे पोलीस महानिरीक्षक अरविंद पांडे यांनी सांगितले की, आम्ही या क्षेत्रात ही योजना राबवित असून त्यात दहा जिल्हे मोडतात. या आपत्कालीन घंटेला जहांगीरची घंटा असे म्हटले आहे. मुघल बादशहा जहांगीर याने त्याच्या राजवाडय़ात ‘इन्साफ की घंटा’ म्हणून ही   बसवली होती.
पांडे यांनी सांगितले की, प्रजासत्ताकदिनी आपल्या निवासस्थानी अशी घंटा बसवण्यात आली असून तिचा आवाजही नेहमीच्या विजेच्या बेलपेक्षा वेगळा असणार आहे. पोलीस महानिरीक्षक ते निरीक्षक पातळीपर्यंतच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी अशा न्यायासाठी घंटा बसविण्यात येतील. दरभंगा जिल्ह्य़ात दरभंगा, मधुबनी, समस्तीपूर, पूर्णिया, कटिहार, किशनगंज, अरारिया, सुपुल, मधेपुरा व सहरसा हे १० जिल्हे येतात.
अडचणीत असलेल्यांसाठी पोलिसांची मदत लगेच मिळावी हा त्यामागचा हेतू आहे. संकटातील लोकांनी पोलीस कार्यालय सुरू व्हायची वाट न बघता ही घंटा वाजवली तरी त्यांना न्याय मिळेल किंबहुना त्या व्यक्तीच्या तक्रारीचे निवारण केले जाईल. जहांगीर घंटेच्या योजनेची अंमलबजावणी कशी होते यावर आपण नियमित लक्ष ठेवणार असून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे पांडे यांनी सांगितले.