गेल्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडींनतर अखेर जनता दलचे (संयुक्त) प्रमुख नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी काही वेळापूर्वी राजभवन येथे जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. नितीश कुमार आता भारतीय जनता पार्टीबरोबर राज्यात सरकार स्थापन करणार आहेत. लवकरच ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, तर भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांची उपमुख्यमंत्री नेमणूक केली जाऊ शकते.

राजीनामा देऊन राजभवनाबाहेर पडलेल्या नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना याबाबतची माहिती दिली. नितीश कुमार म्हणाले, मी नुकताच माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राज्यपालांना सांगितलं आहे की, राज्यातलं विद्यमान सरकार विसर्जित करावं. मला महाआघाडी (महागठबंधन) तोडण्याबाबत चारही बाजूंनी सल्ले मिळत होते, त्यानुसार मी आज राजीनामा दिला आणि विद्यमान सरकार विसर्जित केलं आहे.

राज्यपालांकडे सुपूर्द केलेल्या राजीनाम्यात नितीश कुमार यांनी लिहिलं आहे की, आम्ही महाआघाडीशी नातं तोडलं आहे.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधला. नितीश कुमार आता भाजपाबरोबर सत्ता स्थापन करतील. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजता त्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा >> “मी मरण पत्करेन, परंतु…”, एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चेदरम्यान नितीश कुमारांचा ‘तो’ VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीश कुमारांचा आठ वेळा शपथविधी!

देशातल्या काही मोजक्याच उदाहरणांपैकी नितीश कुमार असे एक नेते आहेत, ज्यांनी आजतागायत आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. परंतु, या आठ कार्यकाळांमध्ये त्यांच्याबरोबर भाजपा, राजद असे वेगवेगळे सहकारी सत्तेत होते. सतत वेगवेगळ्या पक्षांबरोबर आघाडी करणे, युती करून सत्तेत बसण्याच्या नितीश कुमार यांच्या या धोरणामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने ‘पलटू कुमार’, ‘पलटू राम’ अशी खोचक टीकाही केली जाते. २००० साली नितीश कुमार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २०१३ पासून गेल्या १० वर्षांत त्यांनी प्रत्येकी दोन वेळा भाजपा आणि राष्ट्रीय जनता दलशी फारकती घेऊन नव्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.