पाटणा : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी बिहारची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली. त्यानुसार, बिहारमध्ये मतदारांची एकूण संख्या ७.४२ कोटी असल्याचे दिसते. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीनंतर (एसआयआर) ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. २४ जूनला एसआयआरला सुरुवात करण्यापूर्वी राज्यात नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची संख्या ७.८९ कोटी इतकी होती.

दोन मतदारयाद्यांमध्ये फरक पाहिला तर राज्यातील मतदारांची संख्या ४७ लाखांनी घटल्याचे दिसून येते. हा फरक साधारण सहा टक्के इतका आहे. एसआयआरनंतर निवडणूक आयोगाने १ ऑगस्टला प्रसिद्ध केलेल्या मसुदा यादीनुसार, राज्यातील ६५ लाख मतदारांची नावे वगळली गेली होती. ही नावे मृत्यू, कायमस्वरूपी स्थलांतर किंवा दुबार नोंदणी या कारणांवरून वगळण्यात आली होती. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती आणि दावे यासाठी निवडणूक आयोगाने दोन महिन्यांची मुदत दिली होती. या काळात २१ लाख ५३ हजार मतदारांची नावे मसुदा यादीत नव्याने जोडली गेली. त्याचवेळी आणखी ३.६६ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. म्हणजेच या काळात एकूण १७.८७ लाख नावे जोडण्यात आली.

१ ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या मसुदा यादीतून वगळलेल्या ६५ लाखांपैकी २२ लाख जणांचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते, ३६ लाख कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे किंवा अनुपस्थित होते तर सात लाख मतदारांनी दुसरीकडे मतदार म्हणून नावनोंदणी केली होती. सूत्रांनी सांगितले की, अंतिम मतदारयादीमध्ये आणखी वगळलेल्या ३.६६ लाख मतदारांपैकी दोन लाख स्थलांतरित असून ६० हजार जणांचा मृत्यू झाला आहे आणि ८० हजार मतदारांची दुबार नोंदणी आढळून आली.

परदेशी नागरिक नगण्य

अंतिम यादीमध्ये वगळल्या गेलेल्या मतदारांमध्ये किती परदेशी नागरिक होते हे निवडणूक आयोग किंवा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले नाही. मात्र सूत्रांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार वगळलेली जवळपास ९९ टक्के नावे ही मृत, कायमचे स्थलांतरित किंवा दुबार मतदारांची आहेत. त्यामुळे परदेशी नागरिकांची नावे यादीत फारशी नव्हती असे दिसत आहे.

महत्त्वाची आकडेवारी

१ ऑगस्टपर्यंत वगळलेली नावे – ६५ लाख

१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान अतिरिक्त वगळलेली नावे – ३.८६ लाख

एकूण वगळलेली नावे – ६८.५ लाख

१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान जोडलेली नावे – २१.५३ लाख

एकूण वगळलेली नावे – ४७ लाख