पीटीआय, नवी दिल्ली
बिहारमध्ये मतदार यादीच्या सखोल फेरतपासणीवरून (एसआयआर) शुक्रवारीही विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभर तहकूब करण्यात आले.
विरोधी पक्षांनी लोकसभेत ‘एसआयआर मागे घ्या, चर्चा करा’ अशा घोषणा दिल्या. यावर पीठासीन अध्यक्ष कृष्ण प्रसाद टेनेट यांनी आक्षेप घेतला. विरोधकांच्या गोंधळामुळे अखेरीस पीठासीन अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले.
तत्पूर्वी सकाळी संसदेचे कामकाज सुरू होताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी लोकसभा सदस्य आणि जम्मू काश्मीरचे माजी नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आयकर विधेयक मागे
सभागृह तहकूब होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आधी सादर केलेले आयकर विधेयक २०२५ मागे घेतले. दोन वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दुपारी तीन वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच, पीठासीन अध्यक्षांना सीतारमण यांनी विधेयक मागे घेण्याची परवानगी मागितली. त्यानंतर त्यांनी विधेयक मागे घेतले.