बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणीचे (एसआयआर)काम पूर्ण झाले आहे. यानुसार मसुदा यादीत ६५ लाखांहून अधिक मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. या प्रक्रियेवरून विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखून धरले आहे. आता यावरून पुन्हा वादंग होण्याची चिन्हे आहेत.
पाटण्यात सर्वाधिक ३.९५ लाख नावे समाविष्ट करण्यात आली नाही. याखेरीज पूर्व चंपारण्य, मधुबनी तसेच गोपालगंज येथे तीन लाखांहून अधिक नावे मसुदा यादीत नाहीत. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत संसदेत चर्चा होऊ शकत नाही या लोकसभेचे माजी अध्यक्ष बलराम जाखड यांच्या निर्णयाचा दाखला संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी दिला. त्यामुळे या मुद्द्यावर संसदेत विरोधकांची चर्चेची मागणी सरकार मान्य करणार नसल्याचे चित्र आहे. गदारोळात संसदेत शुक्रवारी कामकाज होऊ शकले नाही. बिहारमधील मतदार याद्यांच्या सखोल तपासणीबाबत संसदेत चर्चा व्हावी यासाठी विरोधक आग्रही आहेत.
काँग्रेसचे दिवंगत नेते बलराम जाखड हे १९८० ते ८९ या काळात लोकसभा अध्यक्ष होते. मतदार याद्यांच्या तपासणीचा निर्णय हा निवडणूक आयोगाचा आहे. ही प्रक्रिया काही पहिल्यांदाच होत नाही. त्यामुळे याबाबत चर्चेसंदर्भात सभापतींनी ठरवावे असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.