Bilawal Bhutto Surrender Remark And Pakistan Dictionary: पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी “पाकिस्तानच्या डिक्शनरीत सरेंडर हा शब्दच नाही,” असे विधान केले होते. या विधानावर आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये काही सोशल मीडिया युजर्सनी भुट्टोंना १९७१ च्या युद्धाची आठवण करून दिली, ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याने आत्मसमर्पण केले होते.

बुधवारी इस्लामाबादमध्ये एका परिषदेत बोलताना बिलावल भुट्टो यांनी हे वक्तव्य केले होते. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना बिलावल भुट्टो म्हणाले होते की, “सरेंडर हा शब्द पाकिस्तानच्या डिक्शनरीत आढळत नाही.”

पाकिस्तानस्थित एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, भुट्टो यांनी दहशतवाद्यांना कोणतेही राष्ट्रीयत्व, धर्म, जात किंवा पंथ नसतो, असे म्हणत दहशतवाद संपवण्यासाठी सामूहिक जागतिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी भारतासोबतच्या तणावावर बोलताना, माजी परराष्ट्रमंत्री भुट्टो यांनी काश्मिरी लोकांच्या इच्छा आणि आकांक्षेनुसार जम्मू आणि काश्मीर वाद सोडवण्याची गरज असल्याचे म्हटले. याचबरोबर त्यांनी सिंधू जल करारावरही भाष्य केले.

दरम्यान, बिलावल भुट्टो झरदारी यांचे ‘सरेंडर’ वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटिझन्सनी त्यांना १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाची आठवण करून दिली. एक युजर म्हणाला, “काळजी करू नका, आम्ही पाकिस्तानची डिक्शनरी बदलू. पण आम्ही १९७१ मध्येच ती बदलली होती. कदाचित तुम्ही लोकांनी त्या डिक्शनरीची आवृत्ती गमावली असेल.”

यानंतर आणखी एका युजरने म्हटले, “कदाचित त्यांनी तो धडा वगळला असेल जिथे १९७१ मध्ये ९३,००० पाकिस्तानी सैनिकांनी पूर्ण गणवेशात आत्मसमर्पण केले होते. पूर्व पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. ती अयशस्वी देशाची डिक्शनरी होती!”

१९७१ मध्ये काय घडले होते?

१६ डिसेंबर १९७१ रोजी, १३ दिवसांच्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर, पाकिस्तानने ढाका येथे आत्मसमर्पणाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी केली होती. यावेळी ९३,००० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. यामुळे बांगलादेश मुक्ती संग्राम आणि तत्कालीन भारत-पाकिस्तान संघर्ष अधिकृतपणे थांबला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानच्या पूर्व कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी भारतीय लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा यांच्यासमोर औपचारिकपणे आत्मसमर्पणाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी केली होती. त्यावेळी बांगलादेशातील सर्व पाकिस्तानी सशस्त्र दलांनी आत्मसमर्पण करण्यास सहमती दर्शविली होती.