गेल्या आठवड्यात शनिवारी सकाळी हमासनं गाझा पट्टीतून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले केले आणि युद्धाला तोंड फुटलं. इस्रायलनंही प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर बॉम्बफेक केली. गेल्या आठवड्याभरापासून दोन्ही बाजूंनी निकराचा लढा दिला जात आहे. या घटनेचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत असून हमासच्या पाशवी कृत्यांचा सर्वच राष्ट्रांनी निषेध केला आहे. मात्र, त्यापैकी काहींनी पॅलेस्टिनची सार्वभौम राष्ट्राची मागणी रास्त असल्याची भूमिका घेतली आहे. भारताचाही त्यात समावेश आहे. या युद्धाचे पडसाद जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्येही उमटत असून त्याचे परिणामही लगेचच दिसू लागले आहेत.

नेमकं घडलंय काय?

इस्रायल-हमास युद्धाला तोंड फुटल्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली नागरिकांवर केलेल्या अमानुष अत्याचारांचे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होऊ लागले. त्यावर जागतिक स्तरावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, दुसरीकडे पॅलेस्टाईनची मागणी योग्य असल्याचीही भूमिका काही देशांनी मांडली आहे. पण काहींनी या युद्धाला हमास नसून इस्रायल जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. त्यात हार्वर्ड या जगभरातील प्रसिद्ध विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. पण या विद्यार्थ्यांना आता युद्धासाठी इस्रायलला दोष देणं महागात पडण्याची शक्यता आहे.

३० विद्यार्थी संघटनांचं पत्र…

हार्वर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या ३० विद्यार्थ्यांच्या ३० संघटनांनी आपल्या सह्यांनिशी एक पत्र जारी केलं असून त्यात युद्धासाठी हमासला नसून इस्रायलयला दोष दिला आहे. “अशा गोष्टी हवेत घडत नाहीत. त्यामागे काहीतरी कराण असतं. गेल्या दोन दशकांपासून गाझा पट्टीत लाखो पॅलेस्टिनियन नागरिकांना एक प्रकारच्या खुल्या तुरुंगात राहायला लावलं जात आहे. गेल्या ७५ वर्षांपासून इस्रायलनं पॅलेस्टाईन नष्ट करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यामुळे या सगळ्यासाठी जर कुणाला दोष द्यायचा असेल, तर तो इस्रायललाच द्यायला हवा”, असं या विद्यार्थ्यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

उद्योगविश्वानं घेतली दखल!

दरम्यान, हार्वर्ड विद्यापीठातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांकडून नोकऱ्या ऑफर केल्या जातात. पण या ३० संघटनांच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या न देण्याचा निर्णय पर्शिंग स्क्वेअरचे सीईओ आणि जागतिक श्रीमंतांच्या यादीत समावेश असणारे बिल एकमन यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर (ट्विटर) सविस्तर पोस्टही लिहिली आहे.

“दहशतवादी संघटनांना X वर स्थान नाही”, हमासशी संबंधित सगळी अकाऊंट्स एलॉन मस्क यांनी हटवली

“मला अनेक कंपन्यांच्या सीईओंनी विचारणा केली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी इस्रायलला दोष देणारं ते पत्र जाहीर केलंय, त्यांची यादी हार्वर्ड विद्यापीठाकडून दिली जाणार आहे का? जेणेकरून आमच्यापैकी कुणीही त्यांना नोकरी देणार नाही. जर या पत्रावर सह्या करणाऱ्या सगळ्यांचा या भूमिकेला पाठिंबा असेल, तर त्यांची नावं जाहीर केली जायला हवी. दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेणाऱ्यांनी कशाच्याही मागे लपून राहाता कामा नये”, असं एकमन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एकमन यांची ही पोस्ट आता व्हायरल होऊ लागली असून त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.