केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने राज्यावर या रोगाच्या साथीचे सावट आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे रविवारी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केले. एकीकडे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव होत असतानाच आता बर्ड फ्लूच्या विषयावरुन राजकारण सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सामजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असणाऱ्या आय. पी. सिंह यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विट करुन बर्ड फ्लूवरुन निशाणा साधला आहे.

नक्की वाचा >> देशभरात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव व्हावा म्हणून शेतकरी आंदोलक बिर्याणी खातायत; भाजपा आमदाराचा दावा

आय. पी. सिंह यांनी पंतप्रधान मोदी मोराला दाणे खायला घालत असतानाच फोटो ट्विट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना सिंह यांनी, “या माणसाचं काय करावं? पक्षांना दाणे खायला घातले तर पक्षी बर्ड फ्लूच्या कचाट्यात सापडले,” अशी कॅप्शन दिली आहे.

सिंह यांनी यापूर्वीही केली आहेत वादग्रस्त वक्तव्ये

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अभिनेत्री रिया चक्रवर्तीची बाजू घेत सिंह यांनी ट्विटरवरुन रिया ब्राह्मण असल्याने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये तिला भाजपाच्या लोकांकडून अडकवलं जात असल्याचा आरोप केला होता.  “ब्राह्मणविरोधात भाजपाला एवढा द्वेष का आहे? एका समान्य बंगाली ब्राह्मण कुटुंबातील मुलगी असणाऱ्या रिया चक्रवर्तीचा दोष काय आहे? ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म घेणं गुन्हा आहे का?, भाजपा त्यांच्या संपूर्ण ट्रोल आर्मीसहीत प्रसारमाध्यमांच्या मदतीने ब्राह्मणांना टार्गेट करत आहे. दोष सिद्ध होण्याआधीच ब्राह्मणांंना फासावर लटकवा,” असं सिंह यांनी ट्विट केलं होतं.

महाराष्ट्रावरही बर्ड फ्लूचे संकट

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नसले तरी लातूर जिल्ह्य़ाच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे ३५० कोंबडय़ा दगावल्याने भीतीचे वातावरण आहे. कोंबडय़ांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. बीड जिल्ह्य़ाच्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळले. तीन कावळ्यांचे अवशेष भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्य़ातील तीन हजार ३२१ कुक्कुटपालन केंद्रांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे.

हरियाणामध्ये सरकारकडून घोषणा

हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्य़ातील दोन कुक्कुटपालन केंद्रांतून संकलित केलेल्या नमुन्यांच्या अहवालातून कोंबडय़ांना ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. त्यामुळे तेथे नऊ शीघ्र प्रतिसाद दले तैनात करण्यात आली असून, साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जात असल्याचे  केंद्रीय पशूपालन मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

गुजरात राजस्थानमध्येही फैलाव

गुजरात आणि राजस्थानमध्येही ‘बर्ड फ्लू’ची साथ पसरल्याचे निष्पन्न झाले. गुजरातमधील सूरत जिल्ह्य़ातून आणि राजस्थानच्या सिरोही जिल्ह्य़ातून संकलित केलेल्या पक्ष्यांच्या नमुन्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा विषाणू आढळला.

या चार  राज्यांमध्येही बर्ड फ्लू दाखल

हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्य़ातही ८६ कावळे आणि दोन बगळे मृतावस्थेत आढळले. नहान, बिलासपूर आणि मंडी जिल्ह्य़ातूनही मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पशुपालन विभागाच्या निवेदनात म्हटले आहे. साथीचा फैलाव झालेल्या केरळच्या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये साथ नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले. मध्य प्रदेशातील १३ जिल्हे ‘बर्ड फ्लू’बाधित झाले आहेत. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्य़ातून घेतलेले पक्ष्यांच्या नमुन्यांचा अहवाल आला असून तेथे बर्ड फ्लूची साथ नसल्याचे पशूपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

मार्गदर्शक सूचना 

‘बर्ड फ्लू’ साथीचा फैलाव झालेल्या सातही राज्यांना साथप्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने रविवारी दिली.

केंद्राच्या राज्यांना सूचना

> बर्ड फ्लू’बाबतच्या अफवांना आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी

> जलसाठे, कोंबडी बाजार, कुक्कुल पालन केंद्रे, प्राणिसंग्रहालये इत्यादी ठिकाणी दक्षता घ्यावी

> मृत पक्षी-प्राण्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी. कुक्कुट पालन केंद्रांची जैवसुरक्षा मजबूत करावी

नऊ केंद्रीय पथके सक्रिय

बर्ड फ्लू’बाधित भागांतील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय पथके स्थापन करण्यात आली असून ती त्या त्या भागांची पाहणी करीत आहेत, असे केंद्राने सांगितले आहे. एक केंद्रीय पथक शनिवारी केरळमध्ये पोहोचले. या पथकाने तेथील परिस्थितीचे निरीक्षण करून साथसंशोधन सुरू केले आहे. आणखी एक केंद्रीय पथक रविवारी हिमाचल प्रदेशातील बाधित भागात दाखल झाले असून तेथे सर्वेक्षण सुरू केले आहे.