इम्रान खान यांच्या माफीची मागणी

लाहोर येथे महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्याच्या विरोधात भाजप व त्यांच्या आघाडीच्या संघटनांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाजवळ निषेध आंदोलन केले. युवा मोर्चा, पूर्वांचल मोर्चा, दिल्लीतील भाजपची शीख आघाडी यांचे कार्यकर्ते एकत्र जमले व त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या माफीची मागणी केली.

आंदोलक चाणक्युपरीतील तीन मूर्ती भागात जमले होते. त्यांना पोलिसांनी अडथळे लावून अडवण्याचा प्रयत्न केला. इम्रान खान यांनी माफी मागावी तसेच हिंदू व शिखांच्या धर्मस्थानांची विटंबना थांबवावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली असून लाहोर येथे ज्या भागात महाराज रणजित सिंह यांचा पुतळा होता. तेथे तो परत उभारण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले असल्याचे दिल्ली भाजपचे नेते नवीन कुमार यांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात मंगळवारी लाहोर किल्ल्याजवळ असलेला महाराजा रणजित सिंह यांचा नऊ फूट उंचीचा कांस्य पुतळा तोडण्यात आला. भारताने अधिकृतपणे या प्रकरणी पाकिस्तानचा निषेध केला असून अल्पसंख्याकांवर अशा प्रकारे हल्ले करून त्यांच्या मनात भीती निर्माण करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पेशावर येथे शीख समुदायाचे नेते गोरपाल सिंग यांनी सांगितले की, पंजाब सरकार समाजकंटकांना संरक्षण देत असून सरकारला संरक्षण करता येत नसेल तर पुतळेच बसवू नयेत.