देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरु केली आहे. विजयासाठी जे जे काही करता येईल, ते ते सर्व करण्याची तयारी भाजपाची असते. हे आपण यापूर्वी पाहिलचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकासाठी भाजपाने १५ राज्यांसाठी नवे प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली आहे.

भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नियुक्ती केल्यानुसार, ओम माथुर छत्तीसगढचे प्रभारी असतील, बिप्लब कुमार देव हरियाणाचे प्रभारी, लक्ष्मीकांत वाजपेयी झारखंडचे प्रभारी, राधामोहन अग्रवाल लक्षद्वीपचे प्रभारी, पी. मुरलीधर राव यांच्यावर मध्यप्रदेशची जबाबदारी, विजय रूपाणी पंजाब आणि चंदीगढचे प्रभारी, तरुण चुघ तेलंगणाचे प्रभारी, अरूण सिंह राजस्थानचे प्रभारी, महेश शर्मा त्रिपुराचे प्रभारी, मंगळ पांडे पश्चिच बंगालचे प्रभारी, संबित पात्रा यांच्यावर ईशान्येकडील राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर हरिश द्विवेदी बिहारचे सहप्रभारी असतील. नितीन नबीन छत्तीसगढचे सहप्रभारी, डॉ. राधामोहन अग्रवाल केरळचे सहप्रभारी, डॉ. रमाशंकर कठेरिया मध्यप्रदेशचे सहप्रभारी, नरिंदर सिंह रैन पंजाबचे सहप्रभारी, अरविंद मेनन तेलंगणाचे सहप्रभारी, अमित मालवीय आणि आशा लकडा पश्चिम बंगाल आणि रितुराज सिन्हा ईशान्येकडील राज्यांचे सहप्रभारी असणार आहेत.

महाराष्ट्रातील ‘या’ चार नेत्यांवर २०२४ ची जबाबदारी

दरम्यान, यामध्ये महाराष्ट्रातील भाजपाच्या चार बड्या नेत्यांना देखील मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे बिहारचे प्रभारीपद देण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून पक्षात सक्रिय नसलेले माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे केरळचे प्रभारी म्हणून कार्य करतील. माजी मंत्री पंकजा मुंडे यांची मध्यप्रदेश सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या राजस्थानच्या सहप्रभारी असतील.