लोकसभा निवडणुकांचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. मात्र एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोल्सनी एनडीएला बहुमत मिळेल आणि मोदीच पंतप्रधान होतील असा अंदाज काढला आहे. अशात आता भाजपाने मध्यप्रदेशातलं कमलनाथ सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे. भाजपा नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. मध्यप्रदेश विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. असं असलं तरीही कमलनाथ सरकार स्थिर आणि बळकट आहे असा दावा काँग्रेसने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमलनाथ सरकार आपोआप कोसळेल असा दावा गोपाळ भार्गव यांनी केला आहे. घोडेबाजारावर माझा विश्वास नाही. मात्र कमलनाथ सरकार कोसळण्याची वेळ आली आहे हे सरकार कोसळेल असं आम्हाला वाटतं आहे त्याचमुळे आम्ही राज्यपालांना पत्र लिहून विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मध्यप्रदेश निवडणूक निकाल लागून सहा महिने उलटले आहेत. मात्र लोक या सरकारच्या कामगिरीबाबत खुश नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे अंदाज हे स्पष्ट करत आहेत की मध्यप्रदेशात काँग्रेसकडे बहुमत राहिलेले नाही. त्याचमुळे विधानसभेच्या विशेष अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे असंही भार्गव यांनी म्हटलं आहे.

या सगळ्या घडामोडींनंतर काँग्रेसनेही भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने स्वप्नं पहाणं बंद करावं असे उत्तर काँग्रेसने दिले आहे. नियमानुसार विधानसभेचे अधिवेशन बोलवण्यास काहीही हरकत नाही मात्र ते एखाद्या विधेयकासंबंधी असेल तर ठीक आहे. भाजपाकडून जो दावा केला जातो आहे तो खोटा आहे त्यात काहीही तथ्य नाही असं काँग्रेस नेते मुकेश नायक यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp asks mp governor for special session wants kamal nath to prove majority
First published on: 20-05-2019 at 14:56 IST