BJP vs Asks Rahul Gandhi Vote Chori : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलीकडेच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत (२०२४) मोठ्या प्रमाणात मतांची चोरी केल्याचा दावा राहुल यांनी केला आहे. भाजपा मतं चोरून सत्तेवर आली आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लोकसभा आणि त्यानंतरच्या काही विधानसभा निवडणुकांच्या मतदानात व निकालात मोठा घोटाळा झाला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. या घोटाळ्याला त्यांनी ‘व्होट चोरी’ (मतांची चोरी) असं नाव दिलं आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की “राहुल यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.” तसेच आयोगाने राहुल गांधींना पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं आहे, अन्यथा माफी मागा असंही सांगितलं आहे. १७ ऑगस्ट रोजी आयोगाने यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांना सात दिवसांची मुदत दिली होती. यावर राहुल गांधी म्हणाले, “मी जे काही पुरावे सादर केले आहेत ते निवडणूक आयोगाने मला दिलेल्या माहितीच्या आधारावर आहेत. हा सगळा डेटा त्यांचा असताना ते लोक मला त्याच्यावर स्वाक्षरी करून का मागतायत?”

काँग्रेसच्या मतांचं प्रमाण वाढलंय, पण कोणीही राहुल गांधींना सांगितलं नाही : अमित मालवीय

दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर भारतीय जनता पार्टीने पलटवार केला आहे. भाजपाने म्हटलं आहे की “काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांना गेल्या ३५ वर्षांमध्ये सर्वाधिक मतदान हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालं आहे. त्यांच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की काँग्रेस मतांच्या चोरीचा आरोप करत आहे. परंतु, ते सत्य नाही. काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांच्या मतांच्या प्रमाणात गेल्या ३५ वर्षांत सर्वाधिक वाढ झाली आहे. मला वाटतंय की ही गोष्ट राहुल गांधींना कोणी सांगितली नाही.”

भाजपा प्रवक्ते सी. आर. केसवन म्हणाले, “मतांची चोरी झाली असेल तर काँग्रेसच्या मतांचं प्रमाण वाढलं कसं? राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्राचा प्रश्न टाळला तसा आमचा हा प्रश्न टाळू नये.” दरम्यान, भाजपा नेते प्रदीप भंडारी यांनी कथित आकडेवारी सादर करत राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे असल्याची टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की “काँग्रेस व त्यांच्या सहकारी पक्षांच्या मतांचं प्रमाण १९८९ पासून २०२४ पर्यंत ३९ टक्क्यांवरून ४१ टक्के कसं झालं?”