नवी दिल्ली : उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यांच्या कालावधीत विधानसभेवर निवडून येणे अशक्यप्रद ठरल्याने राज्याच्या नेतृत्वात शनिवारी बदल करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी राज्य भाजपमधील गटबाजी, धुसफूस  हेही  एक कारण  आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरत चालल्यानंतर पक्षाच्या मध्यवर्ती नेतृत्वाने उत्तर प्रदेश आणि कर्नाटकपासून ते त्रिपुरा आणि मध्य प्रदेशमधील गटबाजी संपविण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. इतकेच नव्हे तर भाजप जेथे विरोधी पक्षात आहे अशा महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्येही गटबाजी उफाळून आली आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात बिगर-मराठा (देवेंद्र  फडणवीस), हरयाणामध्ये बिगर-जाट (मनोहरलाल खट्टर) आणि झारखंडमध्ये बिगर-आदिवासी (रघुवर दास) नेत्यांना मुख्यमंत्री केले. या प्रयोगाला अपेक्षित यश आले नाही. जवळपास सात वर्षांनंतर केवळ खट्टर हेच पुन्हा मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांचे आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक इच्छुक नेत्यांमध्ये आपल्याला योग्य ते मिळाले नसल्याची भावना आहे आणि त्यामुळेच बेबनाव वाढला आहे, अशी जोरदार चर्चा आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनतेमध्ये नाराजी होती. विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला काही ठिकाणी चांगलेच हादरे बसले. त्यामुळे पक्षाच्या राज्य स्तरावरील अस्वस्थतेत वाढ झाल्याचे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असली तरी करोनामुळे त्यांना राज्यांचे दौरे करून नेत्यांच्या वैयक्तिक भेटी घेता आल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या कामाला मर्यादा आली, असे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील एका सदस्याने सांगितले.

उत्तराखंडचा विचार करता, पक्षांतर्गत लाथाळ्या हाच नेतृत्वबदलासाठी निर्णायक घटक ठरला. त्रिवेंद्रसिंग रावत यांना हटवून तीरथसिंग रावत यांना मुख्यमंत्रिपदी आणण्याची खेळी यशस्वी झाली नाही. दोघांवरही करोना स्थिती नीटपणे हाताळली नसल्याची टीका झाली. या दोघांचीही निवड नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केली होती. राज्यातील आमदारांना मुख्यमंत्री निवडीचे स्वातंत्र्य न देता दिल्लीतून मुख्यमंत्री लादण्याच्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या धोरणावरही त्यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे. महाराष्ट्रात मोदी-शहा यांनी निवड केलेले देवेंद्र फडणवीस हे  उद्धव ठाकरे यांच्या  सरकारपुढे आव्हान उभे करण्यात यशस्वी ठरले नसल्याचे मानले जात आहे. राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवूनही भाजपला मराठा समाजाचा कितपत पाठिंबा मिळाला, याबाबत संशय आहे. याउलट एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

भाजपच्या एका माजी लोकसभा सदस्याने सांगितले की,  मुख्यमंत्री लादण्याची मोदी-शहा यांची रणनिती फलप्रद ठरलेली नाही.  कर्नाटकात स्थानिक नेत्यांना वाव देऊनही समस्या कायम आहेत, असेही त्याने निदर्शनास आणले.