नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या मॅचफिक्सिंगच्या आरोपामुळे भाजप संतप्त झाला आहे. भाजपने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवत राहुल गांधींना फक्त नोटीस बजावू नका, त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा >>> काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश

इंडियाच्या घटक पक्षनेत्यांच्या रविवारी दिल्लीत झालेल्या सभेमध्ये राहुल गांधींनी भाजप व मोदींवर ताशेरे ओढले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० जागा मिळाल्या तर संविधान बदलले जाईल, असे भाजपच्या नेत्याने म्हटल्याचा दाखला राहुल गांधींनी दिला होता. तसेच, मतदानयंत्रांमध्ये फेरफार करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही केला होता. राहुल गांधी यांनी सभेतील भाषणातून चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल यांची विधाने आक्षेपार्ह व गंभीर परिणाम करणारी आहेत. संविधान बदलण्याची भाषा भाजपच्या कार्यकर्त्यांने केलेली नाही. मतदान यंत्रांमध्ये फेराफेरीचा आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. तरीही राहुल गांधी सातत्याने गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप केंद्रीयमंत्री हरदीप पुरी यांनी केला. पुरी यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. जगातील सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक शिवीगाळ करणे, हा बहुसंख्य काँग्रेस व इतर विरोधी नेत्यांचा खेळ झाला आहे. मोदी लोकसभा निवडणुकीत मॅचफिक्सिंग करत असल्याचा आरोप बिनबुडाचे असून पुराव्याशिवाय आरोप करणे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. त्यामुळे राहुल गांधींवर कारवाई झाली पाहिजे, अशी तक्रार भाजपने केली आहे.